न्यू यॉर्क - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने केलेला खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे. सुषमा स्वराज यांना उत्तर देताना 'राइट टू रिप्लाय'अंतर्गत पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोधी यांनी ‘भारत म्हणजे दक्षिण आशियामधील दहशतवादाची जननी आहे’ असं म्हटलं. यावेळी त्यांनी चक्क पॅलेस्टिनींच्या हल्ल्यात बळी गेलेल्या एका महिलेचं छायाचित्र काश्मीरची महिला म्हणून दाखवलं आणि काश्मिरी जनतेवर भारत कशा प्रकारे अत्याचार करत आहे, हे सांगण्याचा खोटा प्रयत्न केला. हेच भारताचे खरे चित्र आहे असे छायाचित्र झळकावत त्या म्हणाल्या. 'हे छायाचित्र रक्तबंबाळ झालेल्या एका मुलीच्या चेहऱ्याचे आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या अत्याचारामुळे या मुलीची ही स्थिती झाली', असा मुद्दा त्यांनी संयुक्त राष्ट्रात उपस्थित केला. परंतु, हे छायाचित्र भारतातील नसून अन्य देशातील आहे. 17वर्षीय राविया अबू जोमा या मुलीचे हे छायाचित्र असून माध्यमांनी हे छायाचित्र अनेकवेळा दाखवले आहे. गाझा पट्ट्यात 2014 मध्ये इस्रायलकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यादरम्यान या मुलीच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. पुरस्कार विजेते छायाचित्रकार हैदी लेविन यांनी रावियाचे हे छायाचित्र काढले होते.भारताकडून संयुक्त राष्ट्र संघात टेररिस्तान असा उल्लेख करण्यात आल्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने ‘भारतच दहशतवादाची जननी’ असल्याचा कांगावा केला आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत बोलताना पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला होता. ‘भारत आणि पाकिस्तान एकाचवेळी स्वतंत्र झाले. स्वातंत्र्यापासून भारताने आयआयटी, आयआयएम, एम्स यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या संस्था उभारल्या. मात्र पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटना जन्माला घातल्या. त्यांनी केवळ दहशतवादी संघटना उभारण्यातच धन्यता मानली,’ अशा कठोर शब्दांमध्ये स्वराज यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला होता.
पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा चव्हाट्यावर, काश्मिरी सांगून दाखवला पॅलेस्टिन हल्ल्यातला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 5:44 PM