इस्लामाबाद - पाकिस्तानचा दहशतवादाला आश्रय देणारा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. रविवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कुख्यात दहशतवादी हाफीज सईद आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री एकाच मंचावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. इस्लामाबादमध्ये दिफा-ए-पाकिस्तान कौन्सिलने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी हाफीज सईद याला मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले नूर उल हक कादरी हे हाफीज सईदच्या अगदी शेजारी बसलेले दिसून आले. कादरी हे इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात धार्मिक बाबींचे मंत्री आहेत. कार्यक्रमाची आयोजक असलेली दिफा ए पाकिस्तान कौन्सिल ही पाकिस्तानमधील 40 राजकीय पक्षांचा समूह आहे. या कार्यक्रमात हाफीज सईदने भाषणसुद्धा केले होते. तसेच येथे काश्मीर संदर्भात चर्चाही झाली. त्यादरम्यान काश्मीरप्रश्न हा देशासमोर असलेल्या आव्हानाच्या रूपात मांडण्यात आला. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाच्या भूमिकेवर सडकून टीका केली होती. पाकिस्तान हा असा शेजारी देश आहे, की ज्याने दहशतवाद पसरविण्याबरोबरच त्याला नाकारण्याचेही कसब मिळविले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन असून 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड उघड माथ्याने हिंडत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 9/11 चा न्यूयॉर्कवरील हल्ला आणि 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांनी शांततेच्या प्रयत्नांना खीळ घातली आहे. भारत दहशवादामुळे त्रस्त असून, शेजारील देशच याला खतपाणी घालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या कृत्यांमुळे शांतता चर्चा खंडित झाली आहे, असे स्वराज म्हणाल्या होत्या. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासमोर चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला होता. भारतही तयार होता. मात्र, पाकिस्तानने भारताच्या तीन जवानांचे अपहरण करून एकाची हत्या केली. यामुळे भारताने पाकिस्तानला चर्चेसाठी नकार दिल्याचे, सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले होते.
पाकिस्तानमध्ये हाफीज सईद आणि इम्रान खानचे मंत्री एकाच मंचावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 9:01 AM