ब्रुसेल्स - काश्मीर प्रश्नावरूनभारताविरोधात जगभरात अपप्रचार करण्यात गुंतलेल्या पाकिस्तानला युरोपियन युनियनने जबरदस्त धक्का दिला आहे. दहशतवादाच्या मुद्यावरून युरोपियन संसदेतील अनेक देशांच्या नेत्यांनी पाकिस्तानची एका सुरात जळजळीत टीका केली आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना संरक्षण मिळते, तसेच हे दहशतवादी भारतात हल्ले करतात, त्यामुळे आपण भारताला समर्थन दिले पाहिजे, असे युरोपियन युनियनच्या नेत्यांनी सांगितले. भारत सरकारने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर हा प्रश्न वारंवार उपस्थित करत आहे. मात्र पाकिस्तानचा भारतविरोधी डाव फोल ठरत आहे. आता तर युरोपियन युनियनने दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पितळ उघडे पाडले आहे.
युरोपियन युनियनमधील चर्चेत पोलंडचे नेते आणि युरोपियन युनियनमधील प्रतिनिधी रिजार्ड जार्नेकी म्हणाले की, ''भारत जगातील सर्वात महान लोकशाही देश आहे. या देशातील जम्मू काश्मीर या राज्यात होत असलेल्या दहशतवादी कारवायांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. हे दहशतवादी चंद्रावरून येत नाहीत. तर पाकिस्तानमधून पाठवले जातात. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण भारताला पाठिंबा दिला पाहिजे.''