ऑनलाइन लोकमत -
पोखारा, दि. १७ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तानचं विशेष तपास पथक 27मार्चला भारतात येणार असल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. 27 मार्चला भारतात आल्यानंतर 28 मार्चला आपल्या तपासाला हे पथक सुरुवात करेल. ज्याप्रकारे पठाणकोटचा मुद्दा भारत आणि पाकिस्तानने हाताळला गेला आणि सहकार्य मिळालं आहे, चांगला निकाल हाती येईल अशी आशा परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार सरताज अजीज यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार सरताज अजीज यांची भेट झाल्यावर सुषमा स्वराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी आणि पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार भेटलो आणि पठाणकोट हल्ल्यावर चर्चा नाही केली हे शक्य नाही असं सांगत, याच महिन्यात 27 तारखेला पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानचं पथक भारतात येईल अशी माहिती दिली.
पठाणकोट दहशतवादी हल्याचे सर्व पुरावे पाकिस्तानच्या हवाली केले आहेत. पाकिस्तानने तपासासाठी पथक पाठण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत दिली होती. मात्र हे पथक नेमकं कधी येणार याची माहिती देण्यात आली नव्हती.
2 जानेवारीला पठाणकोट एअर बेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता ज्यामध्ये 7 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्यानंतर भारताने या हल्याचा कट पाकिस्तानमध्ये रचला गेल्याचे पुरावे दिले होते. तसंच या हल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूद याचा हात असल्याचेही ठोस पुरावे देत कारवाई करण्याची मागणी भारताने वारंवार केली होती.