गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात मोठा गोंधळ सुरू आहे. नोकरीतील आरक्षणावरुन निदर्शने, जाळपोळ झाली. दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही देश सोडला आहे. बांगलादेशातील सत्तापालटानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात पोहोचलेल्या शेख हसीना यांच्या मुलाने पाकिस्तानवर मोठा दावा केला आहे. बांगलादेशातील अराजकतेसाठी त्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला जबाबदार धरले आहे.
शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांनी बांगलादेशात अशांतता पसरवल्याबद्दल आयएसआयला जबाबदार धरले असून त्यात पाकिस्तानचा हात असल्याचे म्हटले आहे. शेख हसीना बांगलादेशात परतण्याच्या शक्यतेबद्दल बोलताना ते म्हणाले की, बांगलादेशात लोकशाही बहाल होताच आई आपल्या देशात परतेल. ती नक्कीच पुनरागमन करेल पण ती निवृत्त नेते म्हणून परतणार की सक्रिय नेता म्हणून हे अद्याप ठरलेले नाही.
'शेख मुजीबुर रहमान यांचे कुटुंबीय त्यांच्या लोकांना आणि त्यांच्या पक्ष अवामी लीगला सोडणार नाहीत. अवामी लीग हा बांगलादेशातील सर्वात मोठा आणि जुना पक्ष आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत आपण आपल्या लोकांकडे पाठ फिरवू शकत नाही. बांगलादेशमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना झाल्यानंतर ती नक्कीच आपल्या देशात परतणार आहे, असंही ते म्हणाले.
सजीब वाजेद जॉय यांनी आपली आई शेख हसीना यांच्या सुरक्षेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे आभार मानले आणि बांगलादेशमध्ये लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी दबाव आणण्याची विनंती केली. 'माझ्या आईच्या सुरक्षेसाठी मी भारत सरकारचा मनापासून आभारी आहे, असे जॉय म्हणाले. मी पंतप्रधान मोदींचा ऋणी आहे. भारताला पूर्वेकडील भागात स्थैर्य हवे असेल तर त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायावर दबाव आणावा लागेल. बांगलादेशातील 'इंडिया आऊट' मोहिमेबद्दल बोलताना जॉय म्हणाले की, भारतविरोधी शक्ती खूप सक्रिय आहेत आणि अवामी लीगला सत्तेतून बेदखल करून, आयएसआय आता बांगलादेशला पाहिजे तितकी शस्त्रे पुरवू शकते, असंही ते म्हणाले.
'भारताने दबाव आणला पाहिजे'
सजीब वाजेद जॉय म्हणाले, शेख हसीना बांगलादेशला परतणार नाही हे खरे आहे. पण गेल्या दोन दिवसात बरेच काही बदलले आहे. आता आम्ही आमच्या लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते करू. आम्ही त्यांना एकटे सोडणार नाही. अवामी लीग हा भारताचा सहयोगी असल्याचे सांगून जॉय म्हणाले की, भारताने आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करून बांगलादेशातील अवामी लीगच्या नेत्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे. यासोबतच त्यांनी मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नवीन अंतरिम सरकारला देशात कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत ठेवण्याची विनंती केली आहे.