इस्लामाबाद : भारतीय उच्च आयुक्तालयाने इस्लामाबाद येथे शनिवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांसोबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी गैरवर्तणूक केल्याचा तसेच त्यांना धमकाविल्याचा प्रकार घडला आहे. वाजवीपेक्षा जास्त सुरक्षा व्यवस्था ठेवून काही पाहुण्यांना परतही पाठविण्यात आले. या घटनेमुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढणार आहे.
भारतीय उच्चायुक्त अजय बिसेरिया यांनी येथील सेरेना हॉटेलमध्ये आयोजिलेल्या इफ्तार पार्टीला पाकिस्तानातील अनेक पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने सांगितले की, ज्यांच्याकडे निमंत्रणपत्रिका व ओळखपत्र होते त्यांनाच हॉटेलच्या आतमध्ये सोडण्यात येत होते. प्रख्यात पत्रकार मेहरिन जेहरा-मलिक यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, भारताने आयोजिलेल्या इफ्तार पार्टीला जाऊ इच्छिणाºया प्रत्येकाशी दहशतवादविरोधी पथकाचे सुरक्षा जवान गैरवर्तन करत होते. या कार्यक्रमाला जाऊ नका, असे दूरध्वनी अज्ञात व्यक्तीने निमंत्रितांना केल्याचेही उघडकीस आले आहे. पाकिस्तानने भारताला जशास तसे उत्तर देण्याच्या नावाखाली इफ्तार पार्टीत केलेला प्रकार मूर्खपणाचा होता, अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.
पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर जानेवारी २०१६ मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानशी सुरु असलेली चर्चा थांबविली आहे. यंदा १४ फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने बालाकोटवर हल्ला चढवून तेथील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी विमानांनी हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारताने हाणून पाडला होता. तेव्हापासून दोन्ही देशात मोठा तणाव आहे.
कार्यक्रम रद्द केल्याची थापपाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते फरहतुल्ला बाबर यांनी सांगितले की, सेरेना हॉटेलभोवती सर्वत्र बॅरिकेड ठेवण्यात आले होते. भारताने दिलेली इफ्तार पार्टी रद्द झाल्याचे सुरक्षा जवानांकडून काही निमंत्रितांना सांगण्यात आले. हॉटेलचे एक प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. शेवटी चिकाटीने प्रयत्न करून बाबर यांनी सेरेना हॉटेलमध्ये प्रवेश केला व इफ्तार पार्टीला हजेरी लावली. यावेळी भारतीय उच्चायुक्त अजय बिसेरिया यांनी सांगितले, इफ्तार पार्टीला येताना निमंत्रितांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी काही निमंत्रित लाहोर, कराची या शहरांतूनही आले होते.