इस्लामाबाद : पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढल्याने पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी 44 दहशतवाद्यांवर कारवाई केली आहे. तसेच आधी दहशतवादासाठीपाकिस्तानची भूमी वापरली गेली असेल, यापुढे वापरू देणार नसल्याचे वक्तव्य इम्रान खान यांनी केली आहे.
शुक्रवारी इम्रान खान यांनी दहशतवादी संघटनांना हा इशारा दिला. पाकिस्तानची भूमी अशा कोणत्याही दहशतवादी संघटनांना वापरायला देणार नाही ज्या संघटना देशाच्या बाहेरील प्रकरणांमध्ये सहभागी असतील. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये खान पंतप्रधान झाले होते. त्यांनी यापूर्वीच्या सरकारांवर दहशतवाद पोसल्याचा आरोप केला आहे.
मागील सरकारांनी या संघटनांवर कोणतीही कारवाई न केल्याने दहशतवाद फोफावला आहे. तहरीक ए इन्साफ पक्षाच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. यानुसार दहशतवादाशी संघर्ष केला जात आहे. सिंधमधील थारपारकर जिल्ह्यातील एका सभेवेळी इम्रान यांनी हे वक्तव्य केले आहे.
पुलवामा येथील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअर सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतआणि पाकिस्तानमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा शांततेचा राज आळवला आहे होता. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही सशस्त्र देश आहेत, युद्धामुळे कुणाचेही भले होणार नाही. त्यामुळे आपल्याला चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावे लागतील, आम्ही चर्चेस तयार आहोत, असा दावा इम्रान खान यांनी काल केला होता. ''भारताने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कारवाई केली आहे. मात्र युद्ध हे कुठल्याही गोष्टीचा पर्याय ठरू शकत नाही. भारत आणि पाकिस्तान दोघेही शस्त्रसज्ज देश आहेत. त्यामुळे युद्ध झाल्यास गंभीर परिणाम होतील. त्यामुळे दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही.'' असा दावा त्यांनी केला होता.
या आधी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांनी जैश ए मोहम्मदबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानी सरकारच्या सांगण्यावरूनच मसूद अझहर याने भारतात बाँबस्फोट घडवून आणले होते असा गौप्यस्फोट केल्याने पाकिस्तान सरकार तोंडघशी पडले आहे. पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिया यांनी परवेझ मुशर्रफ यांची फोनवर मुलाखत घेतली. यावेळी मुशर्रफ यांनी जैशवर सरकार करत असलेल्या कारवाईचे समर्थनही केले आहे. याच संघटनेने आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.