पाकिस्तानचे नेते आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अति आत्मविश्वासाच्या जोरावर कधी-कधी पाकिस्तानी नेते, मंत्री आणि अधिकारी काहीही बोलून जातात. आता, संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मालीहा लोधी यांचेही नाव अशा नेत्यांमध्ये समाविष्ट झाले आहे. मलीहा लोधी यांनी ब्रिटेनच्या बोरिस जॉनसन यांना परराष्ट्रमंत्री म्हटल्यामुळे त्यांची चांगलीच नाचक्की झाली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या मुलाखतीसंदर्भातील एक फोटो ट्विट केला होता. या फोटोसोबत कॅप्शन देताना, ''पंतप्रधान इम्रान खान यांनी आज सकाळीच ब्रिटिश विदेशमंत्री बोरिस जॉनसन यांच्यासमवेत चर्चा केली'', असे लोधींनी म्हटले आहे. त्यानंतर, काही वेळाताच मलीहा यांना आपली चूक लक्षात आली. त्यामुळे त्यांनी आपले ट्विट डिलीट केले व पहिल्या ट्विटबद्दल माफीही मागितली. मात्र, तोपर्यंत सुपरफास्ट नेटीझन्सने मलीहा लोधींच्या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल करायला सुरुवात केली होती.
दरम्यान, यापूर्वीही मलीहा लोधी या संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानच्या नाचक्कीचे कारण बनल्या होत्या. भारतात काश्मीरमध्ये अत्याचार सुरू असल्याचे सांगताना, पुराव्यासाठी एका 17 वर्षीय फिलिस्तानी तरुणीचा फोटो युएनमध्ये दाखवला होता. सन 2017 मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना, लोधी यांनी आपला अधिकार बजावला होता. त्यावेळी ही मोठी चूक केली होती. त्यानंतर, पुन्हा एकदा त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय चूक झाली आहे.