कराची - बनावट चलनी नोटांमुळे पाकिस्तानीअर्थव्यवस्था पोखरली जात आहे. त्या संकटाला तोंड देण्यासाठी स्टेट बँक ऑफ पाकिस्तान नव्या चलनी नोटा जारी करणार आहे. या नोटांमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांत आणखी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानी मध्यवर्ती बँक स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद यांनी सांगितले की, चलनी नोटांबद्दल असलेले अद्ययावत आंतरराष्ट्रीय निकष पाळून नव्या नोटा तयार करण्यात येतील. पाकिस्तानी चलनी नोटांचे आधुनिकीकरण करण्यासाठी त्यांना वेगळे सुरक्षा क्रमांक देण्यात येतील. या नोटांचे डिझाइनही बदलण्यात येईल. चलनी नोटांमध्ये हळूहळू बदल करण्यात येतील. त्यामुळे या प्रक्रियेने सामान्य माणसांना कोणताही त्रास होण्याची शक्यता नाही. असा त्रास गतकाळात काही देशांतील जनतेला सोसावा लागला होता. ती उदाहरणे पाकिस्तानच्या डोळ्यासमोर आहेत.
काळा पैसा निर्माण होऊ नये, यासाठी तसेच बनावट नोटांना आळा घालण्याकरिता पाकिस्तान नवीन नोटा चलनात आणण्याबरोबरच ५ हजार किंवा त्याहून अधिक मूल्य असलेल्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेणार का, असा प्रश्न काही अर्थतज्ज्ञांना पडला आहे. (वृत्तसंस्था)
उच्च मूल्यांच्या नोटांमुळे अनेक अडचणींमध्ये वाढकॅपिटल इन्व्हेस्टमेंट या संस्थेचे सोहिल फारूक यांनी सांगितले की, आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पाकिस्तानला उच्च मूल्यांच्या नोटांमुळे काळ्या पैशाशी मुकाबला करणे कठीण जात आहे. मात्र, या समस्येवर त्या देशाला प्रभावी उपाय शोधावाच लागेल. आंतरराष्ट्रीय निकषांवर तयार करण्यात आलेल्या नवीन नोटा चलनात आल्यास त्यामुळे अनेक बेकायदेशीर गोष्टींना आळा बसण्याची शक्यता आहे, असे सोहिल फारूक म्हणाले.