इस्लामाबाद : गेली कित्येक दशके काश्मीर, काश्मीर असा जप करत दहशतवाद्यांवर अब्जावधी डॉलर्स उधळणाऱ्या पाकिस्तानला आता भिकेला लागल्य़ावर अक्कल आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली आणि महागाईच्या विळख्यात पुरता कंगाल झालेल्या पाकिस्तानी नेत्यांनी आता परराष्ट्र नीती ठरविली आहे. यामध्ये पाकिस्तान शेजारी देशांशी शांतता आणि आर्थिक कूटनीतीला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे.
१०० पानांच्या या राष्ट्रीय सुरक्षा नीतीमध्ये भारतासोबत काश्मीरमुद्द्यावर अंतिम तोडगा काढत व्यापार आणि व्यवसायीक नात्याला पुढे नेले जाईल. दोन्ही देशांमध्ये दहशतवाद आणि काश्मीरवरून तणाव आहे. यामुळे व्यापारी आणि आर्थिक संबंध खराब झाले आहेत. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने एक्सप्रेस ट्रिब्यूनला मुलाखत देताना म्हटले की, आम्ही पुढील १०० वर्षे तरी भारतासोबर दुष्मनी करणार नाही. ही नवीन नीती शेजारी देशांशी शांतता राखण्यावर आहे. जर काश्मीर मुद्द्यावर चर्चा आणि प्रगती झाली तर भारतासोबत पूर्वीसारखे व्यापारी संबंध होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने आपल्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणात म्हटले आहे की ते आता भू-रणनीतीऐवजी भू-अर्थशास्त्रावर लक्ष केंद्रित करेल. पाकिस्तानच्या धोरणांमधील या बदलामुळे भारतासोबतच्या संबंधांमधील तणाव कमी होईल, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानला हे सांगणे सोपे पण करणे अवघड असल्याचे भारतीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणामध्ये आर्थिक सुरक्षा हा कळीचा मुद्दा असेल, असे पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, या बदलानंतरही, भारतासोबतचा काश्मीर वाद हा पाकिस्तानसाठी "महत्त्वाचे राष्ट्रीय धोरण" म्हणून ओळखला गेला आहे.
पण मोदींच्या काळात अशक्य...नवी दिल्लीत सध्याच्या मोदी सरकारच्या काळात भारतासोबत समेट होण्याची शक्यता नसल्याचेही पाकिस्तानी अधिकाऱ्याने म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान शुक्रवारी नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा शुभारंभ करणार आहेत. पाकिस्तान आपल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा फक्त एक भाग सार्वजनिक करेल, बाकीचा भाग गोपनीय ठेवला जाईल. हे सुरक्षा धोरण बनवण्यात पाकिस्तानी लष्कराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान, नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणावर विरोधक गदारोळ माजवू शकतात, असे मानले जात आहे.