वॉशिंग्टन : भारताकडून होऊ शकणारा संभाव्य अचानक हल्ला रोखण्याच्या डावपेचांचा एक भाग म्हणून आम्ही अण्वस्त्रे विकसित केली आहेत व आमच्या अण्वस्त्रांचा तेवढाच एकमेव उद्देश आहे, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी दिली आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या बुधवारपासून सुरू झालेल्या अमेरिका दौऱ्याच्या पूर्वसंध्येस वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चौधरी म्हणाले की, आमच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे व तो म्हणजे भारताकडून केले जाणारे आक्रमण होण्याआधीच रोखणे. आमची अण्वस्त्रे युद्ध सुरू करण्यासाठी नाहीत. ती (भारतासोबतचे) शक्तिसंतुलन कायम राखण्यासाठी आहेत.‘डॉन’ दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार चौधरी असेही म्हणाले की, पाकिस्तानने अण्वस्त्रे प्रसारबंदीचे उल्लंघन न करता सामरिक डावपेचांचा एक भाग म्हणून अल्प विस्फोटक क्षमतेची अण्वस्त्रे विकसित केली आहेत. त्यामुळे भारताला पाकिस्तानवर आक्रमण करणे कठीण जाईल.पाकिस्तानला भारताकडून हल्ला होण्याची खरोखरच भीती वाटते व तशी परिस्थिती हाताळण्यासाठी पाकिस्तानची काय योजना आहे, याची कोणाही उच्चपदस्थ पाकिस्तानी अधिकाऱ्याने जाहीरपणे वाच्यता करण्याची ही पहिलीच वेळ आहे.भारताने पाकिस्तानवर अचानक व परिणामकारक आक्रमण करण्याचे ‘कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन’ (शत्रूला प्रतिहल्ल्याची संधीही मिळणार नाही अशा अचानक हल्ल्याची व्यूहरचना) अनुसरून त्यानुसार पावले टाकली आहेत, असा दावाही चौधरी यांनी केला. भारताने अशा कोणत्याही व्यूहरचनेची कधीही अधिकृतपणे कबुली दिलेली नाही. परंतु पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांच्या म्हणण्यानुसार हवाई दलाची मदत घेऊन छोट्या; परंतु अत्यंत चपळ लष्करी तुकड्यांनी शत्रूच्या हद्दीत दूरवर घुसून, प्रतिपक्षाला सावध व्हायला वेळही मिळणार नाही, अशा प्रकारचे अचानक हल्ले करण्याची व्यूहरचना आखली आहे.हेच सूत्र पकडून पाकिसतानच्या परराष्ट्र सचिवांनी पुढे असाही दावा केला की, ‘कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन’नुसार भारताने त्यांच्या लष्करी छावण्या पाकिस्तानच्या सीमेजवळ हलविल्या आहेत. यामुळे पारंपरिक युद्धसामग्रीसह अन्य प्रकारची वाहने व इंधन पुरवठ्याची सोय भारताने सीमेजवळ आणली आहे.अशा प्रकारची व्यूहरचना करून भारताने पाकिस्तानवर आक्रमण करण्यासाठी लागणारा वेळ कमी केला आहे. थोडक्यात, भारताने आपल्याकडून अतिक्रमणासाठी ‘जागा’ तयार करून ठेवली आहे, असा आरोपही चौधरी यांनी केला.जेणेकरून भारताला आमच्याविरुद्ध आक्रमण करण्याची संधी मिळणार नाही. असे करण्याचा पाकिस्तानला नक्कीच हक्क आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. (वृत्तसंस्था)चौधरी : अण्वस्त्र नियंत्रण करार नाहीनवाज शरीफ २२ आॅक्टोबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटणार आहेत. पाकिस्तानने आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमास आवर घातला तर अन्य शांततामय उपयोगांसाठी पाकिस्तानला अणू तंत्रज्ञान पुरविण्यासंबंधीच्या कराराचा अमेरिका आग्रह धरत आहे; परंतु शरीफ यांच्या या दौऱ्यात असा कोणताही करार होणार नाही, असेही चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले.अण्वस्त्रांमुळे युद्धाचा पर्याय उरत नाहीचौधरी असेही म्हणाले, आमचे म्हणणे एवढेच आहे की, अण्वस्त्रधारी देश युद्ध (सुरू) करण्यासाठी अशा प्रकारे जागा तयार करीत नसतात. अण्वस्त्रे असल्यावर खरे तर युद्ध करणे हा पर्यायच (शिल्लक) राहत नाही. म्हणूनच भारताने आखलेल्या व्यूहरचनेला उत्तर देण्यासाठी आम्ही, बचावात्मक डावपेचांचा भाग म्हणून अण्वस्त्रे विकसित केली आहेत.
पाकची अण्वस्त्रे भारताचा हल्ला रोखण्यासाठीच
By admin | Published: October 21, 2015 4:28 AM