इस्लामाबाद : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सोमवारपासून दोन दिवस पाकिस्तानात असणार आहेत. याकडे भारत सरकारच्या मुत्सद्यांचीही नजर आहे. चीन पाकिस्तानात ५० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, उभय देशांतील प्रसारमाध्यमांच्या मते, ५० अब्ज डॉलरपैकी मोठा हिस्सा ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअर’ उभारण्यासाठी खर्च केला जाणार आहे. या कॉरिडोअरच्या माध्यमातून चीन, पाकच्या दक्षिणेकडील ग्वादर बंदरपर्यंत रस्ते मार्गाने जोडला जाईल. चीनकडून आठ पाणबुड्याही खरेदी करण्याची शक्यता आहे. याबाबतचा करारही या दौऱ्यात होऊ शकतो. हा सौदा सुमारे पाच अब्ज डॉलरचा असेल. पाकने आज देशाच्या पहिल्या दौऱ्यावर येत असलेले चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठी अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शी यांचा दौरा पूर्ण होईपर्यंत संपूर्ण सुरक्षा व्यवस्था सैन्याकडे राहणार आहे.शी जिंगपिंग यांना एका विशेष समारंभात पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘निशान-ए-पाकिस्तान’ने गौरविण्यात येणार आहे. पाक संसदेच्या संयुक्त अधिवेशनास ते संबोधित करणार आहेत. (वृत्तसंस्था)
चिनी राष्ट्राध्यक्षांसाठी पाकचा चोख बंदोबस्त!
By admin | Published: April 20, 2015 12:22 AM