इस्लामाबाद : भारताला अणुयुद्ध व्हायला हवे असेल, तर जरूर त्यांनी आमची परीक्षा घ्यावी. त्याने भारताचा भ्रमाचा भोपळा चुटकीसरशी फुटेल, अशी आव्हानात्मक वल्गना पाकिस्तानने रविवारी केली.लष्कर दिनाच्या तयारीच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत म्हणाले होते की, अण्वस्त्रधारी पाकिस्तान हा निव्वळ बागुलबुवा आहे. प्रत्यक्ष युद्धाची वेळ आलीच, तर पाकिस्तानचे हे थोतांड जगापुढे लगेच उघडे पडेल.जनरल रावत पाकिस्तानविषयी असेही म्हणाले होते की, त्यांचा दांभिकपणा आम्ही उघड करू. आमच्यावर कर्तव्य बजावण्याची वेळ आलीच, तर पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत, म्हणून आम्ही सीमा ओलांडून आत घुसण्यास अजिबात डगमगणार नाही. जनरल रावत यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानकडून तीव्र आणि धमकीवजा प्रतिक्रिया उमटली. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद युनूस यांनी टिष्ट्वटरवर म्हटले,‘भारतीय लष्करप्रमुखांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार व त्यांच्या पदाला न शोभणारे आहे. त्यांनी जणू अणुयुद्धाचे निमंत्रणच दिले आहे. त्यांची तशीच इच्छा असेल, तर त्यांनी आमच्या निर्धाराची परीक्षा जरूर घ्यावीच. इन्शाअल्ला, जनरलसाहेबांच्या भ्रमाचा भोपळा चुटकीसरशी फुटेल!पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही स्वत:चे संरक्षण करण्यास आम्ही पूर्णपणे समर्थ आहोत, असे बजावले. मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांनी टिष्ट्वटरवर लिहिले की, हा थिल्लरपणा करण्याचा विषय नाही. अनाठायी अंदाज बांधून दुस्साहस कोणीही करू नये. कोणतीही वेळ आली, तरी पाकिस्तान स्वत:चे संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ आहे.पाकिस्तानी लष्कराचे अधिकृत प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनीही भारताला भ्रमात राहण्यापासून सावध केले. समाजमाध्यमांतून ते म्हणाले की, भारतापासून असलेला धोका परतवून लावण्यासाठी पाकिस्तानकडे विश्वासार्ह अण्वस्त्र सज्जता आहे. पाकिस्तान हे एक सजग आणि जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे व आमचे लष्करही व्यावसायिक आहे. त्यामुळे भारताने भ्रमात राहूनये. (वृत्तसंस्था)अगदीच अपरिहार्य वेळ येईल तेव्हा पाकिस्तानच्या बाबतीत ‘कोल्ड स्टार्ट’ची व्यूहरचना अवलंबिण्याचे सैधांतिक धोरण भारताने आखले आहे. यात शत्रूच्या हद्दीत दूरपर्यंत मर्यादित परंतु समन्वयित स्वरूपाचे झटपट हल्ले करून सुरुवातीलाच वरचष्मा मिळविण्याचे तंत्र आहे. भारताची ही व्यूहरचना हाणून पाडण्यासाठी आपल्याकडे छोट्या पल्ल्याची ‘नस्र’ (हफ्त-९) ही भेदक क्षेपणास्त्र असल्याच्या बढाया पाकिस्तान मारत असते.
पाकिस्तानच्या वल्गना, भारताला अणुयुद्ध हवे असेल तर आम्हीही तयार आहोत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:51 AM