कराची : युद्धखोर भारतासह आम्हाला सर्व शेजारी देशांशी मनापासून शांततापूर्ण संबंध हवे आहेत, असे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर बाज्वा यांनी म्हटले आहे. इंटरप्ले ऑफ इकॉनॉमी अँड सिक्युरिटी वर येथे बुधवारी झालेल्या चर्चासत्रात बाज्वा बोलत होते. ते म्हणाले की, भारतासोबत सलोख्याचे संबंध राखण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. मात्र भारताकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. आमची बाह्य आघाडी नेहमीच अस्थिर राहिली आहे. आमच्या पूर्वेला युद्धखोर भारत आणि पश्चिमेला अस्थिर अफगाणिस्तान आहे. ऐतिहासिक गोष्टींमुळे आणि नकारात्मक स्पर्धेमुळे हा भाग जखडलेला आहे, असे बाज्वा म्हणाले. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी दोन्ही सीमांवर असलेल्या अस्थिर परिस्थितीवरही भाष्य केलं.
तणावग्रस्त परिस्थितीचे रूपांतर धोक्यांमध्ये व्हायच्या आधी ती बदलायला हवी आणि त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले. बाज्वा यांनी देशाच्या प्रचंड वाढत्या कर्जाबद्दल काळजी व्यक्त केली. पाकिस्तानला भिकेचे भांडे फेकून द्यायचे असेल तर सकल देशी उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत कमी असलेले कर प्रमाण बदलावेच लागेल, असे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. देशासाठी नंतर धोकादायक ठरणाऱ्या गोष्टींचा सामना आताच करायला हवा, असेही पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी म्हटले. देशाच्या बुडीत चाललेल्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना त्यांनी हे विधान केले.