इस्लामाबादः जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा विरोध प्रदर्शन अद्यापही सुरूच आहे. या मुद्द्यावर पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रातही दाद मागितली. पण तिकडेही त्यांना अपयश आलं. तरीही पाकिस्तानकडून भारताविरोधात वादग्रस्त विधान करण्याचा सिलसिला कायम आहे. आता पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री असलेल्या अली अमीर गंदापूर यांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आम्ही मिसाईल टाकू, असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला आहे.जर काश्मीरच्या मुद्द्यावर भारताबरोबरचा तणाव वाढल्यास पाकिस्तान युद्धासाठीही तयार आहे. अशातच जे देश काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला समर्थन देत आहेत, ते आमचे शत्रू आहेत. आम्ही भारतबरोबरच त्या देशांवरही मिसाइल टाकू, असंही ते म्हणाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाच्या दौऱ्यावर आलेल्या अमेरिकी काँग्रेसच्या एका प्रतिनिधीमंडळाला सांगितलं की, काश्मीरमधली परिस्थिती पाहता भारताबरोबर वार्तालाप करण्यात कोणताही फायदा नाही.अमेरिकी सिनेटर क्रिस वान होलेन आणि मॅगी हसन यांना इम्रान खान यांनी सांगितलं की, भारताबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केल्यानंतर दोन्ही सिनेटरनं आपला अनुभवही पंतप्रधानांकडे कथन केला आहे. मी भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा व्हावी, यासाठी प्रयत्न केले होते, परंतु आता ते शक्य नाही, असं इम्रान खान म्हणाले होते, तर दुसरीकडे भारतानंही पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला पोसणं थांबवत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याची भूमिका घेतली आहे. काश्मीरमध्ये मानवाधिकारांच्या होत असलेल्या उल्लंघनासंबंधी अमेरिकी सिनेटर होलेन यांनीही चिंता व्यक्त केली आहे.
काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला साथ देणाऱ्या देशांवर मिसाईल टाकू; पाक मंत्र्याची दर्पोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 10:31 AM