रामल्ला- रावळपिंडीत कुख्यात दहशतवादी आणि जमात उद दावाचा नेता हाफिज सईद बरोबर एकाच कार्यक्रमात उपस्थित राहणा-या आपल्या राजदुतास पॅलेस्टाइनने माघारी बोलावले आहे. २६/११ सारख्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार असणा-या हाफिजबरोबर पॅलेस्टाइनचे राजदूत वालिद अबू अली यांच्याबरोबर कार्यक्रमात एकत्र भाषण करण्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यावर भारताने संताप व्यक्त केला होता. पॅलेस्टाइनच्या राजदुतांचे हे वागणे आजिबात स्वीकारार्ह नसल्याचे भारताने पॅलेस्टाइनला ठणकावून सांगितले. भारताच्या या कठोर भूमिकेनंतर पॅलेस्टाइनने आजिबात वेळ न दवडता नमते घेत पाकिस्तानातील राजदुताला परत बोलवून रामल्ला येथे हजर राहाण्याचे आदेश दिले आहेत.
भारताच्या दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये आम्ही भारताच्याबरोबर आहोत असा संदेशच पॅलेस्टाइनने दिला आहे. फेब्रुवारी महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइनच्या दौ-यावर जात आहेत, त्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाइनने ही चूक महागात पडू शकते हे लक्षात घेऊन आपल्या राजदूतावर तात्काळ कारवाई केली.
26/11 दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदबरोबर पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील राजदूत वालिद अबू अली एकाच व्यासपीठावर गेल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. भारताने पॅलेस्टाइनच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला होता. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रात भारताने पाठिंबा दिलेला नाही. तरीही पॅलेस्टाइनच्या राजदुतांनी असे कृत्य केल्याबद्दल भारताने संताप व्यक्त केला होता.
वालिद अबू अली आणि हाफिज सईदचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी हा मुद्दा भारत पॅलेस्टाइन सरकारकडे मांडेल असे सांगितले. '' या संदर्भातील माहिती आमच्याकडे आली आहे, हा मुद्दा नवी दिल्लीमधील पॅलेस्टाइनच्या राजदुतांकडे आणि पॅलेस्टाइनसरकारसमोर हा मुद्दा आम्ही जोरदारपणे मांडू '' असे रवीश कुमार यांनी सांगितले. वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांनुसार हे फोटो एका रॅलीमधील असून दिफा -ए-पाकिस्तान या संस्थेने आयोजित केली होती. पाकिस्तानातील ही संस्था भारत आणि अमेरिकेविरोधात गरळ ओकण्याचे काम करते. शुक्रवारी रावळपिंडीतील लियाकत बाग येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पॅलेस्टाइनचा राजदूत शेजारी बसलेला असूनही हाफिज सईदने यावेळेस भारत आणि अमेरिकेविरोधात विखारी भाषण केले. या कार्यक्रमात वालिद अबू अली यांनीही भाषण केले तर इतर वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये काश्मीरचा मुद्दा काढला व अमेरिकेविरोधात विधाने केली आहेत.