न्यूयॉर्क : पॅलेस्टाईनची गेली अनेक वर्षे रखडलेली मागणी आता मान्य झाली असून संयुक्त राष्ट्राच्या आवारात इतर ध्वजांसह पॅलेस्टाईनचाही झेंडा फडकणार आहे. सप्टेंबर महिन्यातच पॅलेस्टाईन आणि व्हॅटिकनचा ध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला.पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय ११९ देशांनी बहुमताने पारित केला, तर ४५ सदस्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. इस्रायलने पॅलेस्टाईनचा ध्वज फडकविण्यास अर्थातच कडाडून विरोध केला होता. इस्रायल, अमेरिकेसह इतर सहा देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले होते. २०१२ साली पॅलेस्टाईनचा दर्जा वाढवून त्यास व्हॅटिकन सिटीप्रमाणे नॉन मेंबर आॅब्झर्व्हरचा दर्जा दिला होता. त्यानंतरही ध्वज फडकविण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. पॅलेस्टाईन अॅथॉरिटीचे अध्यक्ष मेहमूद अब्बास यांनी हा आमच्यासाठी अत्यंत भावनिक क्षण असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये मेहमूद अब्बास आणि नंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांची भाषणे होणार आहेत. (वृत्तसंस्था)गेले काही आठवडे इस्रायलची राजधानी जेरुसलेममधील पवित्र अल अक्सा मशिदीजवळ तणाव निर्माण करणाऱ्या घटनांमुळे आधीच दोन्ही गटांमधील वातावरण तापले आहे. कदाचित या पार्श्वभूमीमुळे अब्बास आणि नेतान्याहू दोघेही संयुक्त राष्ट्रात एकमेकावर आगपाखड करण्याची शक्यता आहे.(वृत्तसंस्था)
संयुक्त राष्ट्रात फडकणार आता पॅलेस्टाईनचा झेंडा
By admin | Published: October 01, 2015 12:06 AM