ठळक मुद्देभारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांच्या निरोप समारंभासाठीही वालिद अबू अली उपस्थित होते तसेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांचीही त्यांनी भेट घेतली आहे असे इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
नवी दिल्ली- 26/11 दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदबरोबर पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील राजदूत वालिद अबू अली एकाच व्यासपीठावर गेल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भारताने पॅलेस्टाइनच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रात भारताने पाठिंबा दिलेला नाही. तरिही पॅलेस्टाइनच्या राजदुतांनी असे कृत्य केल्याबद्दल भारताने संताप व्यक्त केला आहे.वालिद अबू अली आणि हाफिज सईदचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी हा मुद्दा भारत पॅलेस्टाइन सरकारकडे मांडेल असे सांगितले. '' या संदर्भातील माहिती आमच्याकडे आली आहे, हा मुद्दा नवी दिल्लीमधील पॅलेस्टाइनच्या राजदुतांकडे आणि पॅलेस्टाइनसरकारसमोर हा मुद्दा आम्ही जोरदारपणे मांडू '' असे रवीश कुमार यांनी सांगितले. वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांनुसार हे फोटो एका रॅलीमधील असून दिफा -ए-पाकिस्तान या संस्थेने आयोजित केली होती. पाकिस्तानातील ही संस्था भारत आणि अमेरिकेविरोधात गरळ ओकण्याचे काम करते. शुक्रवारी रावळपिंडीतील लियाकत बाग येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पॅलेस्टाइनचा राजदूत शेजारी बसलेला असूनही हाफिज सईदने यावेळेस भारत आणि अमेरिकेविरोधात विखारी भाषण केले. या कार्यक्रमात वालिद अबू अली यांनीही भाषण केले तर इतर वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये काश्मीरचा मुद्दा काढला व अमेरिकेविरोधात विधाने केली आहेत.भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांच्या निरोप समारंभासाठीही वालिद अबू अली उपस्थित होते तसेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांचीही त्यांनी भेट घेतली आहे असे इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.