जेरुसलेम- इस्रायल आणि हमासमध्ये चालू असलेल्या चकमकी आता थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. 2014 च्या गाझा युद्धानंतर सर्वात वाईट अशी परिस्थिती इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यामध्ये उद्भवली आहे. मात्र आता हमासने शस्त्रसंधीसाठी आपण तयार आहोत असे स्पष्ट केले आहे. इस्रायलने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.गेले अनेक तास मध्यस्थांशी चर्चा केल्यानंतर गाझामध्ये शस्त्रसंधी लागू करण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत असे हमासचे उपाध्यक्ष खालील अल हय्या यांनी सांगितले.
त्याआदी काही तास हमासच्या संबंधात असणाऱ्या ट्वीटर हँडलवरुन जर इस्रायलनेही निर्णय घेतला तर आम्ही शस्त्रसंधीला तयार आहोत असे ट्वीट करण्यात आले होते. इस्रायलने इजिप्शियन मध्यस्थांमार्गे आणखी कडक भूमिकेचे संकेतदिले होते. पॅलेस्टाइनच्या हमास संघटनेने आपली कारवाई थांबवली नाही तर आपण आणखी कठोर भूमिका घेऊ आणि पॅलेस्टाइनी संघटनांच्या नेत्यांना लक्ष्य करु असा संदेश इस्रायलने त्यांच्याकडे दिला होता. त्यामुळेच पॅलेस्टाइनी संघटनांना अशी भूमिका घ्यावी लागली आहे.
शस्त्रसंधीच्या प्रश्नावर इस्रायलचे गुप्तचर विभागाचे मंत्री इस्राएल काट्झ यांनी काहीही बोलण्यास नकार दिला मात्र आपण युद्ध वाढण्याच्या विरोधात आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व काही हमासवर अवलंबून आहे. त्यांनी हल्ले कायम ठेवले तर त्याचे काय परिणाम होतील हे सांगता येणार नाहीत अशा शब्दांमध्ये इस्रायलची भूमिका काट्झ यांनी इस्रायल रेडिओवर स्पष्ट केली. इस्रायलने पॅलेस्टाइनच्या हल्ल्यानंतर पॅलेस्टाइनी संघटनांच्या 60 जागांवर प्रतीहल्ले केल्याचे इस्रायली लष्कराने जाहीर केले आहे. या तणावाचे खापर पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी इस्रायलवर फोडले असून इस्रायलमुळे तणावात भर पडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.