Palestinian PM Prime Minister Mohammad Shtayyeh submits resignation : (Marathi News) पॅलेस्टाइनचे पंतप्रधान मोहम्मद शतायेह (Mohammad Shtayyeh) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. सोमवारी (26 फेब्रुवारी 2024) मोहम्मद शतायेह यांनी 'मी माझा राजीनामा राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्बास यांच्याकडे सोपवत आहे' असे म्हणत आपला राजीनामा दिला आहे. गाझा पट्टीत पसरलेली आक्रमकता आणि वेस्ट बँक आणि जेरुसलेममधील तणाव या मुद्द्यांमुळे मोहम्मद शतायेह यांनी राजीनामा दिल्याचे कारण सांगितले आहे.
पॅलेस्टिनी सरकार वेस्ट बँकच्या काही भागांवर आपली सत्ता चालवते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथे हिंसाचारात लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय गाझामधील सततच्या युद्धामुळे मोहम्मद शतायेह यांच्यासमोर समस्या निर्माण झाल्या होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सर्व कारणामुळे मोहम्मद शतायेह यांनी आपला पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
राजीनामा देताना मोहम्मद शतायेह म्हणाले, गाझामधील पॅलेस्टिनी नागरिक उपासमारीने त्रस्त आहेत. असे असूनही तेथे इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. जेरुसलेम आणि वेस्ट बँकमधील परिस्थितीही चांगली नाही. येथेही तणाव शिगेला पोहोचला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी माझा राजीनामा राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्बास यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्बास यांनी मोहम्मद शतायेह यांचा राजीनामा अद्याप स्विकारलेला नाही.