नवी दिल्ली - इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हमासने १०० हून अधिक लोकांचे अपहरण केले आहे. या लोकांमध्ये डोरन आशेर नावाची एक महिला होती, तिच्या दोन मुली आणि आईचाही समावेश आहे. या सर्वांना एका गाडीत भरून गाझाला घेऊन जाण्यात आले. डोरन यांनी पतीला शेवटचा फोन कॉल केला होता, तेव्हा तिने घरात दहशतवादी घुसल्याचे सांगितले त्यानंतर फोन कट झाला तेव्हापासून मी माझ्या पत्नीचा आवाज ऐकला नाही असं डोरन यांच्या पतीने सांगितले.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, डोरन तिच्या मुलींसह सुट्टीला आईच्या घरी गेली होती. डोरनचं मोबाईल लोकेशन ट्रेक केले असता ते सीमेपलीकडे गाझा इथं असल्याचे कळाले. डोरनचे पती घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला ज्यात महिला आणि मुलांना हमासचे दहशतवादी एका गाडीत बंदुकीच्या धाकावर बळजबरीने भरून नेत आहेत. योनी यांनी या व्हिडिओत पत्नी, २ मुली आणि सासू असल्याचे सांगितले.
डोरन यांचे पती योनी म्हणाले की, मी माझ्या पत्नी आणि २ मुलींना ओळखू शकतो. माझी सासूही त्यांच्यासोबत दिसत आहे. त्यांच्या आजूबाजूला हमासचे दहशतवादी आहेत. माझ्या २ मुली आहेत, त्या लहान आहेत. एक ५ वर्षाचीही झाली नाही तर दुसरी ३ वर्षाची आहे. त्यांना का घेऊन गेले, त्यांच्यासोबत काय झाले मला माहिती नाही. माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा, त्यांच्या बदल्यात मला बंधक बनवा असं आवाहन हमासला केले आहे.
हमासच्या हल्ल्यात कमीत कमी ७०० इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. १५०० हून अधिक नागरिक जखमी आहेत. सोशल मीडियावर महिला आणि लहान मुलांचे अपहरण केल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओत २५ वर्षाची कॉलेज तरुणी ओरडताना दिसतेय. तिला हमासचे दहशतवादी बाईकवर बसवून अपहरण करताना दिसतात. तिच्या बॉयफ्रेंडलाही दहशतवाद्यांनी पकडले आहे. एका अन्य व्हिडिओत महिला सैनिकाला दहशतवाद्याच्या गाडीच्या डिक्कीमधून तिचे केस ओढत खेचताना दिसत आहे.