इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला सहा महिने उलटले आहेत. या काळात गाझामध्ये 33 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. लाखो लोक गंभीर जखमी झाले आहेत. उर्वरित लोक उपासमारीचा सामना करत आहेत. याच दरम्यान, इस्रायलने दक्षिण गाझाच्या भूमीवर लढणारे आपले सर्व सैनिक मागे घेतले आहेत. खान युनिस शहरातून इस्रायली सैन्याने माघार घेतल्यानंतर समोर आलेले फोटो धक्कादायक आहेत. संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालं आहे. सर्वत्र विध्वंसाचं दृश्य पाहायला मिळत आहे.
इस्रायलच्या हल्ल्यामुळे घरं जमीनदोस्त झालेली दिसतात. शाळा, रुग्णालये आणि स्टेडियमचं मोठं नुकसान झालं आहे. इकडे तिकडे मृतदेहांचे ढीग पडले आहेत. रस्ते आणि पूल जीर्ण झालेले दिसतात. गेल्या सहा महिन्यांपासून इस्रायलच्या हल्ल्यांना तोंड देत असलेले हे शहर आता शांत आहे. कारण इस्त्रायली सैनिक येथून निघून गेले आहेत. आता पॅलेस्टिनी आपापल्या घरी परतत आहेत. ते पुन्हा आयुष्य सुरू करण्याचा विचार करत आहेत, परंतु बहुतेक लोकांना त्यांची घरे ओळखता येत नाहीत, इतकं मोठं नुकसान झालं आहे.
इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यांमुळे खान युनिस शहराचं भयंकर रुप पाहायला मिळत आहे. इस्रायली सैनिकांनी खान युनिस सोडल्यानंतर समोर आलेल्या फोटोंनी सर्वांनाच धक्का दिला आहे. खान युनिस येथील विस्थापित व्यक्ती अहमद अबू रीश यांनी सांगितलं की, "आम्ही घराचं काय झाले ते पाहण्यासाठी आलो, पण सुरुवातीला आम्हाला घर सापडलं नाही. फक्त ढिगारा शिल्लक आहे. तुम्ही इथे राहू शकत नाही. इथे प्राणी जगू शकत नाहीत तर माणसं कशी जगणार?" इस्रायलने दक्षिण गाझा भूमीवर लढणारे आपले सर्व सैन्य मागे घेतलं आहे. आयडीएफने गाझामधील खान युनिस भागात आपले मिशन पूर्ण केल्याचं म्हटलं आहे. तिने आता रफाहवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. इजिप्त आणि गाझा यांच्या सीमेवर असलेले रफाह हे एकमेव क्षेत्र उरले आहे जेथे इस्रायली सैन्य अद्याप पोहोचलेले नाही. जर आयडीएफने रफाहमध्ये ग्राउंड ऑपरेशन केले तर मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी लोक मारले जातील, कारण 13 लाखांहून अधिक लोकांनी येथे आश्रय घेतला आहे.
दुसरीकडे, इस्रायली ओलीसांच्या सुटकेसाठी निदर्शने सुरू आहेत. हजारो लोक हातात पोस्टर आणि बॅनर घेऊन जेरुसलेमच्या रस्त्यावर उतरले, त्यांनी इस्रायली सरकारला ओलीसांच्या सुटकेसाठी हमासशी करार करण्याचे आवाहन केलं. ओलीस घेतलेल्यांच्या कुटुंबियांना भीती वाटते की जर करार न करता युद्ध सुरू झाले तर आणखी ओलीस मारले जातील. यासह आंदोलकांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या वॉर कॅबिनेटच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.