ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 13 - देशदेशातील बड्या व्यक्तींची अवैध संपत्ती उघड करणारा पनामा पेपर गेटप्रकरणी कुटुंबीयांसहीत अडचणीत आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची खुर्ची जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील राजकारणात त्यांच्या उत्तराधिका-यासंदर्भात जोरदार चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे.
मंगळवारी संयुक्त तपास पथकाकडून सुप्रीम कोर्टात सोपवण्यात आलेल्या अहवालानंतर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंजाबचे मुख्यमंत्री व त्याचे भाऊ शहबाज शरीफ यांना बैठकीसाठी बोलावले होते. या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये शहबाज शरीफ यांच्या व्यतिरिक्त शरीफ यांचा पक्ष ""पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज""मधील कित्येक मोठे नेतेही उपस्थित होते.
संयुक्त तपास पथकानं सुप्रीम कोर्टात अहवाल सोपवल्यानंतर येथील परिस्थितींसंदर्भात चर्चा करण्यासाठी नवाज यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये शहबाज शरीफ यांची उपस्थितीमुळेच त्यांना नवाज यांचे उत्तराधिकारी बनवले जाण्याचा अंदाज लावला जात आहे.
शहबाज शरीफ
पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजमधील एका वरिष्ठ नेत्यानं सांगितले की, ""शहबाज शरीफ सध्या खूप सांभाळून आपल्या प्रत्येक चाली चालत आहेत. संकट काळात ते आपल्या भावासोबत उभे आहेत. शिवाय, ज्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत त्यावरही शहबाज लक्ष ठेऊन आहेत. पुढे ते असेही म्हणाले की, "नवाज शरीफ अडचणीत अडकल्यास शहबाज त्यांचे उत्तराधिकारी असू शकतात. यासंदर्भात पक्षामध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे. पण, यावरुन पंजाबचा मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र शहबाज पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यासही ते आपल्या हातातून पंजाब निसटू देणार नाहीत. दरम्यान, पंजाब स्वतःकडे ठेवण्यासाठी त्यांना अनेक प्रयत्न करावे लागतील".
दरम्यान, पीएमएल-एनच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, पक्षनेतृत्व त्यांचे नेतृत्व गपचुप स्वीकारतील आणि केंद्रात त्यांना मोठी भूमिका पार पाडण्यास देतील? की 2018मध्ये सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत कुण्या एक व्यक्तीला पंतप्रधानपदी निवडलं जाईल, हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे.
काय आहे पनामागेट प्रकरण?
पनामा पेपर लीक प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची देशाबाहेर मोठी संपत्ती असल्याचे आरोप आहेत. पनामा पेपर लिक झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्यात अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय नेत्यांची देशाबाहेर मोठी संपत्ती असल्याचे उघडकीस आले होते. त्यात नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचेदेखील नाव आहे.
गेल्या वर्षी ४ एप्रिल २०१६ रोजी अंतरराष्ट्रीय पत्रकांनी शरीफ यांचे नाव त्यात असल्याचे छापले होते.