नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आपल्या भाषणात देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरुंचा उल्लेख करतात. संसद सभागृहातही त्यांनी नेहरुंचा उल्लेख करत काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मात्र, आता सिंगापूरच्या पंतप्रधानांनी तेथील संसद सभागृहात नेहरुंच्या कामाचा उल्लेख केला. पंतप्रधान ली सीन लूंग यांनी यावेळी भारतातील खासदारांवर टिका केली. भारतातील अर्ध्यापेक्षा अधिक खासदार बलात्कारी आणि हत्यारे असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
भारताच्या परराष्ट्र विभागाने सिंगापूरच्या उच्चायुक्तांकडे या विधानसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. ली सीन लूंग यांनी पंडित जवाहरलाल नेहरुचं कौतुक करताना ते उत्कृष्ट क्षमता असलेले असामान्य व्यक्ती होते, असे म्हटले. 'देशातील लोकशाहीने कसे काम केले पाहिजे', या विषयावर संसदेत एका जोरदार चर्चेवेळी लूंग यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंचा उल्लेख केला. बहुतांश देश हे उच्च आदर्श आणि महान मुल्यांवर आधारित असतात. त्यातूनच त्या देशाचा प्रवास सुरू होतो. संस्थापक नेते आणि पुढील पिढ्यांकडून नवीन पिढ्यांमध्ये, दशकांमध्ये बदल होत असतो.
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढणारे, जिंकणारे नेते मोठे धाडसी, महान संस्कृती आणि उत्कृष्ट क्षमता असणारे असामान्य व्यक्ती असतात. डेविड बेन गुरियन, पंडित जवाहरलाल नेहरु हे असेच नेते होते, असे लूंग यांनी म्हटले. याच भाषणात भारतातील खासदारांवरही त्यांनी भाष्य केलं. माध्यमांच्या वृत्तानुसार, भारतातील निम्मे खासदार बलात्कारी आणि खून आहेत, यातील काही आरोप राजकीय वैमनस्यातून झाल्याचंही म्हटलं आहे. मात्र, पंडित नेहरुंचा भारत देश सध्या असा बनला आहे, असे ली यांनी सिंगापूरच्या संसदेत म्हटले.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान ली यांचं हे भाषण ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. तसेच, 'देशातील लोकशाहीने कसे काम केले पाहिजे', या विषयावरील संसद चर्चासत्रात ली यांनी नेहरुंचं कौतूक केलं. पण, आपले पंतप्रधान संसदेत आणि बाहेरही नेहरुंवर टीका करतात, असे जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.