वॉशिंग्टन : पाकिस्तानात ‘जैश-ए-महंमद’च्या नऊ तळांसह २२ दहशतवाद प्रशिक्षण तळ सक्रिय आहेत. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही, असे वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने गुरुवारी येथे सांगितले व सीमेपलीकडून दहशतवादी कृत्ये सुरूच राहिली, तर पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई दलाने जशी कारवाई केली तशीच पुन्हा केली जाईल, असा इशारा दिला.भारताने बालाकोटमधील जैश-ए-महंमदच्या सगळ्यात मोठ्या दहशतवाद प्रशिक्षण तळावर २६ फेब्रुवारी रोजी दोनपेक्षाही कमी मिनिटांत केलेल्या हवाई हल्ल्यात जवळपास ३५० दहशतवादी व त्यांना प्रशिक्षण देणारे ठार झाले. मात्र, आमचे काहीही नुकसान झाले नाही, असा दावा पाकिस्तान सातत्याने करीत आहे; पण तिथे जाणाऱ्या पत्रकारांना गेल्या ९ दिवसांत पाकिस्तानी लष्कराने तीनदा रोखले आहे, तसेच हवाई हल्ल्यात १९ झाडे नष्ट केल्याबद्दल पाकिस्तानने अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.१४ फेब्रुवारीला पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी सुरक्षित राहावेत म्हणून या तळावर आणण्यात आले होते. (वृत्तसंस्था)
दहशतवाद प्रशिक्षणाचे पाकमध्ये २२ तळ सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 4:44 AM