तालिबान एका बाजुला जगासमोर शांतीपूर्ण भूमिकेच्या गोष्टी करत असताना दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानातील पंजशीर खोऱ्यात तालिबान्यांनी युद्धसंग्राम सुरू केला आहे. तालिबानला विरोध करणाऱ्या नॉदर्न अलायन्सविरोधात तालिबानी दहशतवाद्यांनी युद्धाला सुरुवात केली आहे. यात तालिबानकडून पंजशीर खोऱ्या घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्थानिक पत्रकार नातिक मालिदजादाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्याच्या सीमेवर गुलबहार परिसरात तालिबानी आणि नॉदर्न अलायन्समध्ये चकमक झाली. इतकंच नव्हे, तर तालिबान्यांनी एक पूल बॉम्बस्फोटानं उडवून देत नॉदर्न अलायन्सची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच काही सैनिकांनाही ताब्यात घेतल आहे, असं ट्विट नातिक मालिकजादा यानं केलं आहे.
याआधी सोमवारी रात्री देखील तालिबानी आणि नॉदर्न अलायन्समध्ये गोळीबार झाला होता. यात ७ ते ८ तालिबानी दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. पंजशीर खोरं अजूनही तालिबानच्या ताब्यात आलेलं नाही. याठिकाणी अहमद मसूदच्या नेतृत्त्वाखालील नॉदर्न अलायन्स तालिबान्यांना खडतर आव्हान देत आहे. अहमद मसूदचे प्रवक्ते फहीम दश्ती यांनीही तालिबानसोबत झालेल्या चकमकीच्या माहितीला दुजोरा दिला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबान्यांनी सोमवारी रात्री पंजशीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलेलं नाही. तालिबाननं याआधीच पंजशीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा देखील ठप्प केली आहे. याचा गाजावाजा झाल्यानंतर काही वेळानं इंटरनेट सेवा पुन्हा सुरू देखील करण्यात आली होती.
अमेरिकेचं सैन्य आता अफगाणिस्तानमधून पूर्णपणे माघारी परतलं आहे. त्यानंतर तालिबाननं आता काबुल विमानतळावरही कब्जा केला आहे. लवकरच अफगाणिस्तानात तालिबान सरकार स्थापन करणार आहे. तालिबानचे बडे नेते कंधारमध्ये असून लवकरच ते काबुलला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.