काबूल: पंजशीरमधील बंडखोरांचं आव्हान मोडून काढल्याचा दावा कालच तालिबाननं केला. त्यामुळे आता संपूर्ण अफगाणिस्तानवरतालिबानचा कब्जा आहे. मात्र तालिबाननं पंजशीर ताब्यात घेतल्याची घोषणा केल्यानंतरच्या रात्रीच हवाई हल्ले झाले. विशेष म्हणजे पंजशीरमधील तालिबानच्या अड्ड्यांवरच या विमानांनी हल्ले केले. त्यामुळे तालिबानचं मोठं नुकसान झालं. आता हे हल्ले केले कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पंजशीरमधील तालिबान्यांच्या अड्ड्यांवर रात्री उशिरा हवाई हल्ले झाल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं. अज्ञात विमानांनी तालिबानच्या अड्ड्यांवर हल्ले केले. त्यानंतर ही विमानं नॉर्दर्न अलायन्सच्या बंडखोरांचं वर्चस्व असलेल्या भागांकडे निघून गेली. गेल्या अनेक दिवसांपासून नॉर्दर्न अलायन्सनं पंजशीरचा किल्ला समर्थपणे लढवला. त्यामुळे नॉर्दर्न अलायन्सच्या बाजूनं तालिबानवर हल्ले कोणी केले, असा प्रश्न विचारला जात आहे.भारताला हादरवण्यासाठी पाकिस्तानचा मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये २०० दहशतवादी घातपाताच्या तयारीत
एअर स्ट्राईक करणारी विमानं कोणाची?तालिबानवर हल्ला करणारी ती विमानं ताजिकिस्तानमधून आली असावीत, असं अफगाणिस्तानातील अनेक पत्रकारांना वाटतं. कारण नॉर्दर्न अलायन्सचे प्रमुख अहमद मसूद सध्या ताजिकिस्तानमध्ये आहेत. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू असा निर्धार मसूद यांनी केला आहे. याशिवाय तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केला, त्यावेळी अफगाणिस्तान लष्कराचे अनेक सैनिक लढाऊ विमानांसह ताजिकिस्तानला पळून गेले. त्यांनी तिथेच आश्रय घेतला. ताजिकिस्ताननं याआधी अनेकदा नॉर्दर्न अलायन्स आणि तालिबानविरोधी गटांना साथ दिली आहे.
इराण, रशियानं केला हल्ला?ताजिकिस्तानसोबतच रशिया आणि इराणवरदेखील तालिबानला संशय आहे. नॉर्दर्न अलायन्सवर पाकिस्ताननं हल्ले केले. त्या हल्ल्यांचा इराणं निषेध केला होता. दुसऱ्या देशांमध्ये पाकिस्ताननं नाक खुपसू नये, अशा शब्दांत इराणनं निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे हे हल्ले इराणनं केले असण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेनं काढता पाय घेतला आणि तिथे तालिबाननं वर्चस्व मिळवलं. त्यावरून रशियानं अमेरिकेवर टीका केली होती. त्यामुळे तालिबानला धक्का देण्यासाठी रशियानं नॉर्दर्न अलायन्सला साथ दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र रशिया आणि इराणला तालिबाननं सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे हे दोन्ही देश तालिबानवर हल्ले करतील असादेखील प्रश्न निर्माण होत आहे.