मागच्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवरील घरवापसीला आता काही तासच उरले आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ केद्रामधून स्पेसक्राफ्ट अनडॉक झालं असून, ते भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे ३.३० वाजता समुद्रात उतरण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सुनीता विल्यम्स आणि त्यांना घेऊन येणाऱ्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या परतीच्या प्रवासाची प्रकिया कशी असेल, याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे.
अमेरिकेची अंतराळ संस्था असलेल्या नासाकडून सुनीता विल्यमस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाबाबतची माहिती नियमितपणे दिली जात आहे. तसेच या प्रवासाबाबतचं वेळापत्रकही नासाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून, त्यामध्ये हवामानातील बदलानुसार बदलही होऊ शकतो. नासाच्या वेळापत्रकानुसार सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासाची पूर्ण वेळ १७ तासांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
सुनीता विल्यम्स आणि त्यांच्यासोबत असलेल्या अंतराळवीरांना घेऊन येत असलेल्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या परतीच्या प्रवास विविध टप्प्यांमध्ये होणार आहे. स्पेसक्राफ्टमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अंतराळवीर प्रेशर सूट परिधान करतात. त्यानंतर हॅच बंद करून कुठलीही गळती होत नसल्याची पडताळणी केली जाते. त्यानंतर हे स्पेसक्राफ्ट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळं होतं. अनडॉकिंगची ही प्रक्रियासुद्धा विविध टप्प्यांमध्ये होते. तसेच अखेरच्या टप्प्यात हे स्पेसक्राफ आंतरराष्ट्रीय अंतराल केंद्रापासून पूर्णपणे वेगळं होऊन, पृथ्वीच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करतं. सुनिता विल्यम्स यांना घेऊन येत असलेल्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टची आज सकाळी १०.३० च्या सुमारास अनडॉकिंग झाली आहे.
त्यानंतर स्पेसक्राफ्ट डीऑर्बिट बर्न सुरू करतं. ही प्रक्रिया बुधवारी पहाटे २ वाजून ४१ मिनिटांनी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार इंजिन सुरू केलं जाईल, त्यामुळे स्पेसक्राफ्ट हे पृथ्वीच्या आणखी जवळ येईल. स्पेस एक्सचं ड्रॅगन हे स्पेसक्राफ्ट तब्बल २७ हजार किमी प्रति तास वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल. त्यानंतर जमिनीपासून सुमारे १८ हजार फूट उंचीवर सर्वप्रथम दोन ड्रॅगन पॅराशून उघडतील. तर ६ हजार फुटांवर मुख्य पॅराशूट उघडेल.
अखेरच्या टप्प्यात स्पॅशडाऊन अर्थात अंतराळवीरांचं लँडिंग फ्लोरिडामधील समुद्र किनाऱ्याजवळच्या समुद्रात होईल. या भागातील हवामान खराब असल्यास अन्य ठिकाणीही ही लँडिंग होऊ शकते. लँडिंगची सध्याची नियोजित वेळ ही बुधवारी पहाटे ३ वाजून २७ मिनिटांची आहे.