सिंगापूर - येथे कोरोना महामारीच्या काळात मुलं जन्माला घालण्यासाठी लोकांना पैसे दिले जात आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या नोकऱ्यांवर गदा आल्याने ते आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. एवढेच नाही, तर आपले कुटुंब वाढविण्याचीही त्यांची इच्छा नाही. त्यांची ही चिंता आणि ताण तणाव दूर करण्यासाठी सिंगापूरसरकारने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप देण्यात येणाऱ्या रकमेचा तपशील सरकारने जारी केलेला नाही. प्रोत्साहनपर दिली जाणारी ही रक्कम सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक छोट्या बेबी बोनसच्या व्यतिरिक्त आहे.
सिंगापूर, जगातील सर्वात कमी जन्मदर असलेला देश - जगातील सर्वात कमी जन्मदर सिंगापूरमध्ये आहे. तो वाढावा यासाठी अनेक वर्षांपासून लोकांना प्रोत्साहन दिले जात आहे. सिंगापूर हा देश आपले शेजारी असलेल्या इंडोनेशिया आणि फिलिपीन्सच्या तुलनेत अत्यंत वेगळा आहे. खरे तर या देशात, कोरोना व्हायरस लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्भधारणा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. सिंगापूरच्या उप पंतप्रधान हेंग स्वी कीट सोमवारी म्हणाल्या, आमच्या काणावर आले आहे, की करोना व्हायरसमुळे मुलं जन्माला घालण्याचा विचार करत असलेल्या लोकांनी आपला विचार स्थगित केला आहे. उप पंतप्रधानांनी यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेसंदर्भात आणि ती दिलीजाण्यासंदर्भात, नंतर घोषणा केली जाईल, असे म्हटले आहे.
सिंगापूरमधील सध्याची बेबी बोनस प्रणाली -सिंगापूरमध्ये सध्या सुरू असलेल्या बेबी बोनसच्या नियमानुसार, संबंधित अपत्याच्या आई-वडिलांना 10,000 सिंगापूर चलनापर्यंत (जवळपास 5.50 लाख रुपये) दिले जातात. सरकारी आंकडेवारीनुसार, 2018मध्ये सिंगापूरमधील प्रजनन दर मागील आठ वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी नोंदवला गेला. जो प्रति महिला 1.14 एवढा आहे. ढासळणारा प्रजनन दर हा आशियातील अनेक देशांत चिंतेचा विषय आहे.
चीनमध्ये या वर्षाच्या सुरुवातील 70 वर्षांतील सर्वात कमी प्रजनन दर नोंदवला गेला. मुलांशी संबंधित या योजनेवर टीकाही करण्यात आली आहे.