पॅरिस : संयुक्त राष्ट्रांनी येथे सोमवारपासून आयोजित केलेल्या वातावरण बदलावरील (क्लायमेट चेंज) जागतिक परिषदेत कार्बन उत्सर्जनाला कमी करण्यासाठी प्रदीर्घ काळ उपयोगी पडेल असा करार करण्याचा प्रयत्न होईल. परिषदेला जगातून १५० देशांचे सर्वोच्च नेते उपस्थित राहणार असून पंधरा दिवसांपूर्वी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अतिशय कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी या प्रश्नाला टिकावू असा जागतिक उपाय शोधला पाहिजे, असे आवाहन केले. ११ डिसेंबरपर्यंत ही परिषद चालेल. बान की मून, मोदी यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन परिषदेला पहिल्या दिवशी उपस्थित असतील. गेल्या २० वर्षांतील ही अशा स्वरूपाची पहिलीच परिषद आहे. मोदी हे वातावरण बदलाच्या प्रश्नावर भारताची बाजू मांडतील. बराक ओबामा यांची व मोदी यांची पहिल्याच दिवशी भेट होईल. परिषदेला पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि ऊर्जामंत्री पीयूष गोयलही उपस्थित राहतील. बराक ओबामा यांनी आयोजित केलेल्या ‘मिशन इन्नोव्हेशन’ला मोदी उपस्थित राहतील. अनेक शतकांपासून विकसित व श्रीमंत देश कार्बनचे फार मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन करीत आहेत, त्यामुळे या संकटाला तोंड देण्यासाठी या देशांनीच निधी व विकसनशील देशांना कमी खर्चाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भारत फार पूर्वीपासून करीत आहे. या पार्श्वभूमीवर भारत व इतर देशांनी २००५ पासून कार्बन उत्सर्जन ३५ टक्क्यांपर्यंत घटविण्याचा निर्धार केला आहे.या परिषदेला कॉन्फरन्स आॅफ पार्टीज (सीओपी २१) असेही ओळखले जाते. कोपनहेगन येथे अशीच परिषद झाली होती. (वृत्तसंस्था)——————-भारत देणार २५ लाख डॉलर 1 व्हॅलेटा, माल्टा : राष्ट्रकुलातील गरीब देशांना वातावरण बदलाच्या संकटाला तोंड देता यावे यासाठी भारत २५ लाख डॉलर देणार आहे. या निधीतून त्या देशांना स्वच्छ ऊर्जेचा वापर आणि कार्बन वायूचे उत्सर्जन कमी करण्यास मदत मिळेल.2 ही घोषणा राष्ट्रकुलची द्वैवार्षिक बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी करण्यात आली. राष्ट्रकुल देशांत ब्रिटन, आॅस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूरसारखे शक्तिशाली व मालदीव, टोंगो आणि नौरूसारखे छोटे बेट असलेले देश आहेत. 3 परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले की, ‘‘राष्ट्रमंडळाच्या ५३ सदस्यांत ३१ देश छोटे आहेत व त्यांच्यासाठी व्यापार महत्त्वाचा आहे.’’
पॅरिस : आजपासून वातावरण बदल परिषद
By admin | Published: November 30, 2015 1:14 AM