वॉशिंग्टन : पॅरिस हवामान बदल करारामुळे भारत आणि चीनला एक प्रकारची खुली सूट मिळून अमेरिकी अर्थव्यवस्थेला ६५ लाखांहून अधिक नोकऱ्यांचे नुकसान झाले असते, अशी टीका अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी बुधवारी केली. नॅशनल असोसिएशन आॅफ मॅन्युफॅक्चर्स २०१७ या उत्पादन परिषदेत ते म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आधी अमेरिकेचे हित पाहतात. त्यांनी अमेरिकेला पॅरिस करारातून वेगळे करण्याचा निर्णय घेण्यास जास्त काळ लोटलेला नाही. ट्रम्प यांनी या महिन्याच्या प्रारंभी पॅरिस करारातून अमेरिकेचे नाव मागे घेण्याची घोषणा केली होती. हा ‘कठोर’ करार अमेरिकेला अनुचित पद्धतीने दंडित करून भारत आणि चीनसारख्या देशांना लाभ पोहोचवतो, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या या निर्णयाचे समर्थन करताना पेन्स म्हणाले की, पॅरिस करारामुळे पुढील २५ वर्षांत अमेरिकी अर्थव्यवस्थेला ६५ लाखांहून अधिक उत्पादनाशी संबंधित नोकऱ्यांचे नुकसान झाले असते तर चीन आणि भारताला एक प्रकारची खुली सूट मिळाली असती, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेच्या हिताला प्राधान्य देऊन या भयंकर करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तथापि, या करारावर फेरवाटाघाटी किंवा एक वेगळा करार तयार करण्यासाठी त्यांनी देशाची दारे खुली ठेवली आहेत. मी येथे उपस्थित उत्पादकांना शब्द देतो की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नेहमीच असे पाऊल उचलतील. अमेरिकी उत्पादकांकडे आपले कारखाने चालविण्यासाठी तसेच देशात भविष्यात किफायतशीर, मुबलक आणि विश्वसनीय ऊर्जा उपलब्ध असावी यासाठी ट्रम्प दररोज संघर्ष करीत आहेत, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
पॅरिस कराराने भारत, चीनचेच चांगभले
By admin | Published: June 22, 2017 2:00 AM