वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांनी गुरुवारी सहाय्यकाच्या मदतीने हेलिकॉप्टरमधून पॅराशूटद्वारे उडी मारून आपला ९० वा वाढदिवस साजरा केला. त्यांची ही आठवी पॅराशूट उडी होती. माईनेतील हा एक अत्यंत आल्हाददायक दिवस आहे. पॅराशूट उडीसाठी पुरेसा पूरक असा, असे टष्ट्वीट सीनिअर बुश यांनी केले आहे. अलीकडील काही समारंभामध्ये बुश हे अशक्त वाटले होते. त्यांनी मायनेच्या केन्नेबंकपोर्टजवळील आपल्या घराजवळ हेलिकॉप्टरमधून पॅराशूटद्वारे उडी घेतली. त्याचे चित्रीकरण टीव्हीवर दाखविण्यात आले. यात हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालताना दिसते. त्यानंतर त्यातून बुश उडी घेताना आणि काही क्षणांनी ते जमिनीवर उतरल्याचे दिसून येते. उपस्थितांनी त्यांच्या नव्वदीतील या साहसाचे कौतुक केले. पहिली पॅराशूट उडी दुसऱ्या महायुद्धात सिनिअर बुश यांनी पहिली पॅराशूट उडी दुसऱ्या महायुद्धादरम्यान घेतली होती. तो दिवस होता दोन सप्टेंबर १९४४. प्रशांत महासागरातील ची ची जिमा बेटावर त्यांच्या विमानावर हल्ला करण्यात आला असताना त्यांनी पॅराशूटद्वारे उडी घेतली होती. त्यांनी हा अनुभव एनबीसी वाहिनीवर कथन केला. याच घटनेच्या स्मृतीने आपणास पुन्हा उडी मारण्यास प्रवृत्त केल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या उडीदरम्यान मी पॅराशूटची रिप कॉर्ड खूपच आधी ओढल्याने विमानाचे शेपूट डोक्यावर आदळले होते. त्यामुळे मी पॅराशूट उडीदरम्यानची ही चूक पुढे दुरुस्त करण्याचे ठरवले होते. (वृत्तसंस्था)
सिनिअर जॉर्ज बुश यांची वाढदिवशी पॅराशूट उडी
By admin | Published: June 14, 2014 3:56 AM