ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 27 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यंदा पत्रकारांच्या वार्षिक मेजवानी कार्यक्रमात अनुपस्थित राहणार आहेत. मीडियासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. 122 वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेत 36 वर्षांनी एखादे राष्ट्रपती या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. तत्पूर्वी 1981 साली रोनाल्ड रीगन हे या मेजवानी कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. ट्रम्प यांनी ट्विटरवरून पत्रकारांच्या मेजवानी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, व्हाइट हाऊस कॉरस्पाँडंट असोसिएशनच्या वार्षिक मेजवानी कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही. सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा, तुमची संध्याकाळ सुंदर असो. (अनेक माध्यमांना व्हाइट हाऊसची बंदी)
I will not be attending the White House Correspondents' Association Dinner this year. Please wish everyone well and have a great evening!— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 25, 2017
अमेरिकेत मेजवानी कार्यक्रमाची परंपरा 122 वर्षांपासून चालत आली आहे. 1981मध्ये हल्ल्यात जखमी झाल्यामुळे रोनाल्ड रीगन कार्यक्रमाला उपस्थित राहिले नव्हते. मात्र त्यांनी फोनवरून त्यांचा संदेश कळवला होता. तर 1972मध्ये रिचर्ड निक्सन हेसुद्धा या मेजवानी कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. त्यांचे मीडियाशी फार काही चांगले संबंध नव्हते. ट्रम्प आणि मीडिया हा वाद सर्वश्रुत आहे. तसेच ट्रम्प यांच्या विरोधात बातम्या देण्याचा आरोप असलेल्या माध्यम संस्थांना व्हाइट हाऊसमधील विस्तारित पत्रकार परिषदेत प्रवेश नाकारण्यात आला आहे. यात न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन आणि बीबीसी यांसारख्या संस्थांचा समावेश आहे.