विमानात दारुच्या नशेत एका व्यक्तीने लघुशंका केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. पत्नीसोबत प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने इतकी दारू प्यायली की त्याने विमानाच्या सीटवरच लघुशंका केली. यावेळी एअर होस्टेस आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासोबत सु्द्धा गैरवर्तन केले. ही घटना ब्रिटनमधील आहे.
प्रवाशाच्या या कृत्याप्रकरणी कोर्टाने आता आपला निकाल दिला आहे. दोषी ठरवून कोर्टाने त्याला दंड ठोठावला आणि भविष्यात असे न करण्याचे निर्देश दिले. मँचेस्टर युनायटेडच्या रिपोर्टनुसार, विमानात असभ्य कृत्य करणाऱ्या या व्यक्तीचे नाव लॉयड जॉन्सन असे आहे. तो सुट्टीसाठी दुबईला गेला होता. पत्नीसोबत परतत असताना त्यांने विमानाच्या सीटवर लघुशंका केली. तसेच, त्याने दारुचे सेवन केले होते. ही घटना जानेवारीची आहे, त्यावर कोर्टाने आता निकाल दिला आहे.
चॅपल-एन-ले-फ्रिथ येथील रहिवाशी असलेल्या लॉयड जॉन्सनने जास्त दारू प्यायली होती.त्याला पायावर उभे राहताही येत नव्हते. त्याने विमानात गोंधळ घातला आणि बाकीच्या प्रवाशांना खूप त्रास दिला. त्याच्या तोंडातून दुर्गंधी येत होती. विमान लँडिंग झाल्यानंतर तो टॉयलेट वापरण्याचा आग्रह करू लागला मात्र कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले. यानंतर त्यांनी गॅलरीत सीटच्या मधोमध लघुशंका केली, असे कोर्टात सांगण्यात आले.
दरम्यान, दंड ठोठावताना कोर्टाने लॉयड जॉन्सनला 12 महिन्यांची Community Sentence सुनावली. तसेच, त्याने कोणाचेही नुकसान केल्याचे सिद्ध न झाल्याने त्याला तुरुंगात जाण्यापासून दिलासा मिळाला. मात्र कोर्टाने त्याला फटकारले आणि 80 तास पगाराशिवाय काम करण्याची शिक्षा सुनावली.