बीजिंग : चीनमध्ये विमान हवेत असताना एका प्रवाशाने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला; पण विमानातील कर्मचाऱ्यांनी, तसेच इतर प्रवाशांनी त्याला रोखले व विमान सुखरूपपणे उतरले. ९५ प्रवासी व ९ कर्मचारी असलेले शेन्झेन हवाई सेवेचे विमान तैझाऊ ते ग्वांगझोऊ (हाँगकाँगजवळ) असे जात होते. विमान उतरत असताना एका प्रवाशाने आपल्या आसनाला आग लावण्याचा प्रयत्न केला. विमानातील कर्मचारी व प्रवासी यांनी त्याला रोखले; पण चिनी सोशल मीडियावर विमानातील अर्धवट जळालेले आसन, तसेच बाहेर पडण्याची जागा काळी झालेली दाखविण्यात आली. यावेळी झालेल्या गोंधळात दोन प्रवासी जखमी झाले.त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिनी अधिकाऱ्यांनी या घटनेचे काही तपशील दिले. चिनी विमानात अशा घटना घडल्याचे प्रमाण वाढले असून, विमानातील आणीबाणीच्या वेळी उघडण्याचे दार उघडणे, प्रवाशात व कर्मचाऱ्यांत भांडणे होणे, असे प्रकार नेहमीच घडत आहेत. प्रवाशाचा स्वत:लाच पेटविण्याचा प्रयत्न ही ताजी घटना आहे. विमान उतरल्यानंतर प्रवासी व कर्मचारी यांना बाहेर काढण्यात आले.
विमानात प्रवाशाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Published: July 26, 2015 11:43 PM