विमानतळावर लँडिंग होत असताना प्रवाशाकडे असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी ए२१ फोनला आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर विमानात एकच खळबळ माजली. या घटनेनंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांना आपत्कालीन स्लाईड्सच्या माध्यमातून बाहेर काढलं. अलास्का एअरलाईन्सचं विमान सिएटल-टाकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड करत असताना हा प्रकार घडला.
अलास्का एअरलाईन्सचं विमान लँड होत असताना गॅलेक्सी ए२१ फोन अधिक तापला. त्यातून स्पार्किंग होऊ लागलं. गॅलेक्सी ए२१ तापून त्यानं पेट घेतला. फोनला लागलेल्या आगीची तीव्रता इतकी जास्त होती की आग विझल्यानंतर तो ओळखणं कठीण गेलं, असं सिएटल विमानतळाचे प्रवक्ते पेरी कूपर यांनी सांगितलं. प्रवाशाकडे गॅलेक्सी ए२१ हा स्मार्टफोन याची माहिती सिएटल पोलिसांनी दिली.
पोर्ट ऑफ सिएटलनं ट्विट्सच्या माध्यमातून घटनेची माहिती दिली आहे. 'सोमवारी संध्याकाळी १२८ प्रवासी आणि ६ कर्मचाऱ्यांना बसमधून टर्मिनसला आणण्यात आलं. गॅलेक्सी ए२१ला लागलेल्या आगीमुळे कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही,' अशी माहिती पोर्ट ऑफ सिएटलनं दिली. सीएनईटीनं दिलेल्या वृत्तानुसार सॅमसंगच्या प्रवक्त्यांनी या घटनेबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं.
गॅलेक्सी ए२१ सॅमसंगचा मिड रेंजमधील स्मार्टफोन आहे. ४ हजार मेगाहर्ट्झची बॅटरी असलेला फोन लोकप्रिय आहे. याआधी गॅलेक्सी नोट ७ च्या फोनबद्दलदेखील असेच प्रकार घडले होते. फोनमध्ये स्फोट होत असल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर हा फोन हवाई प्रवासात बॅन करण्यात आला.