रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान एक कुत्रा (Service Dog) हिरो बनला आहे. या कुत्र्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही एक निवेदन जारी करून या कुत्र्याचे कौतुक केले आहे आणि शेकडो जीव वाचवल्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत. दरम्यान, पॅट्रोन (Patron) नावाचा हा कुत्रा युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेशी संबंधित आहे.
WION मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा आहे की, पॅट्रोनने आतापर्यंत रशियन सैनिकांनी पेरलेली 150 हून अधिक स्फोटक उपकरणे (Explosive Devices) शोधली आहेत, ज्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले आहेत. जर पॅट्रोनने हे केले नसते तर युक्रेनचे मोठे नुकसान झाले असते, असे सांगण्यात आले आहे.
पॅट्रोन हा युक्रेनियन शहर चेर्निहाइव्हजवळ स्फोटक उपकरणे शोधण्यासाठी आणि निकामी करण्यासाठी जबाबदार असलेल्या टीमसोबत काम करणारा सर्व्हिस डॉग आहे, असे सोमवारी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, रशियन हल्ले सुरू झाल्यापासून पॅट्रोनने 150 हून अधिक स्फोटक उपकरणे शोधून काढली आहेत. युक्रेन शहर सुरक्षित केल्याबद्दल आम्ही पॅट्रोनचे आभार मानतो.
सोशल मीडियावर व्हायरल होतायेत Video @patron_dsns या इन्स्टाग्राम हँडलवर सोशल मीडियावर पॅट्रोनचे अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत, जे व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये तो कर्तव्य बजावताना दिसत आहे. पॅट्रोन हा दोन वर्षांचा असून तो जॅक रसेल टेरियर (Jack Russell Terrier) जातीचा कुत्रा आहे. युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेच्या (SES) चेर्निहाइव्ह शाखेचा हा मेंबर युक्रेनमध्ये तसेच जगभरात प्रसिद्ध झाला आहे.
पॅट्रोनवर चित्रपट बनणारयाआधी सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीनेही ड्युटीवर असलेल्या पॅट्रोनचा व्हिडिओ शेअर केला असून, त्याच्या कथेवर एक दिवस चित्रपट बनवला जाईल, असे सांगितले आहे. "एक दिवस पॅट्रोनची कथा मोठ्या पडद्यावर दाखवली जाईल, परंतु सध्या तो आपली व्यावसायिक कर्तव्ये निष्ठेने पार पाडत आहे," असे ट्विटमध्ये म्हटले आहे.