नवी दिल्ली: उन्नव आणि कथुआ बलात्कार प्रकरणांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असताना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनांचे पडसाद उमटले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तिना लगार्ड यांनीही भारतातील महिलांच्या सुरक्षेवर भाष्य केलं आहे. महिलांवरील अत्याचारांची गंभीर दखल घ्या, असा सल्ला क्रिस्तिना लगार्ड यांनी मोदींना दिला आहे. मोदींनी महिलांच्या सुरक्षेकडे अधिकाधिक लक्ष द्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं. 'भारतात जे काही घडलं, ते अतिशय किळसवाणं होतं. याप्रकरणाची भारतातील प्रशासकीय यंत्रणा गंभीर दखल घेतील, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदींकडून याची सुरुवात होईल, अशी आशा आहे. भारतातील महिलांच्या सुरक्षेसाठी हे अतिशय आवश्यक आहे,' असं क्रिस्तिना लगार्ड यांनी म्हटलं. महिलांची स्थिती सुधारा, असा सल्ला लगार्ड यांनी गेल्या चार महिन्यात दोनवेळा मोदींना दिला आहे.याआधी जानेवारीत दाओसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेतही लगार्ड यांनी भारतातील महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. मोदी यांनी या परिषदेत भाषण केलं होतं. या भाषणात महिलांचा फारसा उल्लेख नसल्याचं लगार्ड यांनी म्हटलं होतं. 'मोदींनी दाओसमध्ये भाषण केलं होतं. त्यांच्या या भाषणात भारतातील महिलांचा फारसा उल्लेख नव्हता, हे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं,' असं लगार्ड यांनी म्हटलं.
महिलांवरील अत्याचारांची गंभीर दखल घ्या; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा मोदींना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 10:48 AM