नवी दिल्ली- बँकांचे तब्बल 9 हजार कोटी बुडवून फरार झालेला किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्याला इंग्लंडच्या न्यायालयानं जोरदार धक्का दिला आहे. किंगफिशर एअरलाइन्सनं सिंगापूरस्थित बीओसी एव्हिएशनला 90 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 579 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठीही भारत सरकार प्रयत्न करतेय.इंग्लंडच्या उच्च न्यायालयात किंगफिशरनं भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानासंदर्भात खटला सुरू होता. त्यावेळी न्यायाधीशांनी 62 वर्षीय माल्ल्यांच्या कंपनीला हा दंड ठोठावला आहे. दंड का ठोठावू नये, यासंदर्भात न्यायालयानं विचारलेल्या प्रश्नाला माल्यांच्या वकिलांना उत्तर देता आले नाही. या खटल्यात बीओसी एव्हिएशननं युनायटेड ब्रुअरीज व किंगफिशर एअरलाइन्सला प्रतिवादी केले होते. बीओसी एव्हिएशनला अनुकूल निकाल दिल्यानंतर न्यायालयानं माल्याला ही रक्कम, दंड व कायदेशीर कारवाईचा खर्च असं मिळून किंगफिशरनं बीओसीला 90 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 579 कोटी रुपये द्यावेत, असं म्हटलं आहे. दुसरी कंपनी युनायडेट ब्रुअरीज ही दंडाची अर्धी रक्कम देण्यासाठी बांधील असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.बीओसी एव्हिएशन व किंगफिशर एअरलाइन्स यांच्यात चार विमानं भाडेपट्ट्यावर देण्याबाबत करार करण्यात आला होता. करारानुसार त्यातील तीन विमानं किंगफिशरला भाडेतत्त्वावर दिली होती. मात्र एक विमान देणं शिल्लक ठेवलं होतं. आधीच्या विमानांचे पैसे किंगफिशर एअरलाइन्सकडून न आल्यानं चौथ्या विमानाची डिलिव्हरी देण्यात टाळाटाळ करण्यात आली होती. त्याप्रमाणेच बीओसी एव्हिएशनच्या दाव्यानुसार सुरक्षेसाठी दिलेली अनामत रक्कम किंगफिशरकडून येणं असलेल्या रकमेपेक्षा कमी होती. त्यामुळे या कंपनीनं या रकमेच्या वसुलीसाठी इंग्लंडच्या कोर्टात खटला दाखल केला होता. अखेर न्यायालयानं बीओसी एव्हिएशनच्या बाजूनं निकाल देत किंगफिशरला दणका दिला होता.
विजय माल्ल्याला इंग्लंडच्या न्यायालयाचा दणका, ठोठावला 579 कोटी रुपयांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 9:25 PM