डाएट आणि साखर हे सध्याचे परवलीचे शब्द झालेले आहेत. जगभर जरा सुखवस्तू किंवा आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेली दोन माणसं गप्पा मारायला एकत्र आली की त्यांचा विषय आपोआप वाढलेलं वजन, ते कमी करण्यासाठी करण्याचं डाएट आणि मग अर्थातच गोड खाणं कमी केलं पाहिजे याकडे वळतोच. अन्नपदार्थ आणि त्यातही साखरेची मुबलकता आणि बैठी जीवनशैली यामुळे वजन, डाएट आणि साखर हे तीन विषय आपल्या जगण्याचा आता अविभाज्य भाग बनले आहेत. त्यातही साखर खाणं कमी केलं तर वजन आटोक्यात येईल हे बहुतेकांना समजतं, पण साखर सोडणं वाटतं तितकं सोपं नसतं. कारण एकीकडे साखरेने वजन वाढणारी सर्वसामान्य माणसं साखर सोडण्यासाठी धडपडत असतात, तर दुसरीकडे गोड पदार्थ आणि एकूणच जंक फूड बनवणाऱ्या कंपन्या जास्तीत जास्त लोकांनी आपला माल विकत घ्यावा यासाठी धडपडत असतात. त्यासाठी या कंपन्या सतत लोकांना काय पाहिजे आहे याचा अंदाज घेत असतात. लोकांच्या बदलत्या गरजा आणि आवडीनिवडींप्रमाणे ते त्यांची उत्पादनं बनवत आणि बदलत असतात.
फोना इंटरनॅशनल नावाच्या चॉकलेट्स, बेकरी प्रॉडक्टस् आणि इतर मधल्या वेळचे खाण्याचे पदार्थ बनवणाऱ्या कंपनीने नुकताच एक सर्व्हे केला. त्यात त्यांना काही गमतीशीर निष्कर्ष हाती लागले. त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा लक्षात आलेला मुद्दा असा की मागील वर्षीपेक्षा जास्त लोकांना यावर्षी आहारातील साखर कमी करण्याची इच्छा आहे. पण जेव्हा ते एखादा पदार्थ विकत घ्यायला जातात तेव्हा त्यात साखर नेमकी किती आहे याहीपेक्षा त्याची एकूण चव कशी आहे आणि किंमत किती आहे यावर त्यांचा निर्णय जास्त अवलंबून असतो. अगदी नेमकं सांगायचं झालं तर ७० टक्के ग्राहकांनी असं सांगितलं, की एखाद्या पदार्थात नेमकी साखर किती आहे यापेक्षा त्याची एकूण चव कशी आहे हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, तर ६२ टक्के ग्राहकांनी सांगितलं, की पदार्थातल्या साखरेपेक्षाही त्याची किंमत काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे.
जरा जास्त वयाच्या ५० टक्के ग्राहकांना असं वाटत होतं, की त्यांनी साखर खाण्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. मात्र तुलनेने १८ ते २३ वयोगटातील केवळ ३१ टक्के ग्राहकांना त्यांच्या आहारातील साखर कमी करण्याची गरज वाटत होती. इतकंच नाही, तर या वयोगटातील ३८ टक्के ग्राहकांना असं वाटत होतं की, ते आत्ता ज्या प्रमाणात साखर खातायत ते योग्य आहे आणि त्यात कुठलाही बदल करण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्यांना आहारातील साखर कमी करण्याची इच्छा होती तेही लोक साखर कमी करण्यासाठी चवीशी किंवा फ्लेवर्सशी तडजोड करायला तयार नव्हते. त्यातही प्रत्येकाची साखर कमी करण्यासाठी काय करायचं याची तऱ्हा वेगवेगळी आहे.
६७ टक्के लोकांनी साखर कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या शीतपेयांऐवजी साधं पाणी प्यायला सुरुवात केली. ३७ टक्के लोकांनी त्यांच्या आहारातून काही विशिष्ट पदार्थ किंवा पेयं वजा केली. ३७ टक्के लोकांनी कुठल्याही पदार्थात किंवा पेयात वरून जास्तीची साखर घालणं बंद केलं. ३० टक्के लोकांनी पदार्थाच्या पाकिटावर छापलेला पोषणमूल्यांचा तक्ता बघून त्यातल्या त्यात कमी साखर असलेले पदार्थ निवडायला सुरुवात केली. २९ टक्के लोकांनी ते दिवसभरात खात असलेल्या एकूण उष्मांकांमध्ये घट केली. ज्या लोकांनी त्यांच्या आहारात साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि वजन घटविण्यासाठी बदल केले त्यांना फोना इंटरनॅशनलने विचारलं की तुम्ही आहारात नेमका काय बदल केलात? त्यावेळी ५८ टक्के लोकांनी सांगितलं की त्यांनी शीतपेयं पिणं कमी केलं आहे. ५४ टक्के लोकांनी सांगितलं, त्यांनी गोळ्या, चॉकलेट्स खाणं कमी केलं आहे, तर ५१ टक्के लोकांनी सांगितलं की त्यांनी बेकरीचे पदार्थ खाणं कमी केलं आहे.
गेल्या काही वर्षांत बदललेली जीवनशैली, जंक फूडचा एकूणच वाढलेला खप आणि त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात अनारोग्याला तोंड द्यायला लागतं आहे. हे दुष्परिणाम दिसायला लागल्यावर लोकांनी आहारात बदल करायला घेतले आहेत. त्यातही साखर कमी करणं हाच मार्ग लोकांनी अनुसरायला सुरुवात केली आहे.
फूड इंडस्ट्रीने केले बदल
इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी साखर खाणं कमी केलं म्हटल्यावर फूड इंडस्ट्रीकडून याची दखल घेतली जाणं अपरिहार्यच होतं. फूड इंडस्ट्रीने यावर शोधलेलं उत्तर काय आहे? तर २०१७ सालापासून २०२१ सालापर्यंतच्या काळात “आमच्या पदार्थात कमी साखर आहे.” असा दावा करणाऱ्या पदार्थांची संख्या ५४ पटींनी वाढली आहे. त्यात ‘अजिबात साखर नाही’ ‘नगण्य प्रमाणात साखर आहे’ आणि ‘कमी साखर आहे’ असे तीनही प्रकारचे दावे करणारे पदार्थ आहेत. फूड इंडस्ट्री ही इतर कुठल्याही इंडस्ट्रीप्रमाणे जे ग्राहकांना हवे ते देण्यासाठी धडपडते आहे. आता आपण हेल्दी फूड मागायचं की अनहेल्दी हा निर्णय ग्राहकांच्या हाती आहे.