Prime Minister Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील NDA ला बहुमत मिळाले अन् काल(दि.9) मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन)चे प्रमुख नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. नवाझ शरीफ म्हणाले की, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशावरुन लोकांचा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे दिसून येते.
नवाझ शरीफ यांनी सोशल मीडिया साइट X वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल मी मोदीजींचे हार्दिक अभिनंदन करतो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तुमच्या पक्षाला मिळालेल्या यशावरून तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचे दिसून येते. आता द्वेषाचे आशेत रुपांतर करुया आणि दक्षिण आशियातील दोन अब्ज लोकांचे नशीब घडवण्याच्या संधीचे सोने करूया.'
पाकिस्तानचे पंतप्रधान आणि नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ यांनीदेखील पीएम मोदींचे अभिनंदन केले आहे. मात्र, त्यांचा अभिनंदनाचा संदेश अधिक औपचारिकता होता. शाहबाज शरीफ यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन.'
नवाज शरीफ पंतप्रधान मोदींच्या पहिल्या शपथविधी सोहळ्याला पोहोचले2013 मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर नवाझ शरीफ यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारतासोबतचे संबंध सुधारण्याला आपले प्राधान्य असल्याचे म्हटले होते. पुढच्याच वर्षी नरेंद्र मोदी निवडणुका जिंकून सत्तेत आले तेव्हा त्यांनीही तसाच संकेत दिला होता. पंतप्रधान मोदींनी नवाझ शरीफ यांना दिल्लीला बोलावले आणि पहिल्यांदाच एका पाकिस्तानी पंतप्रधानाने भारतीय पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यात भाग घेतल्याचे दिसले.
यानंतर डिसेंबर 2015 मध्ये अफगाणिस्तानहून परतत असताना पंतप्रधान मोदी अचानक पाकिस्तानात पोहोचले. लाहोर विमानतळावर शरीफ यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर दोन्ही नेते एकाच हेलिकॉप्टरमध्ये बसून रायविंड शहरात गेले होते. नवाझ शरीफ यांच्या नातवाच्या लग्नाला उपस्थित राहून पंतप्रधान मोदी दिल्लीत परतले. मात्र, एवढी जवळीक होऊनही चर्चा पुढे सरकू शकली नाही आणि पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव अजूनही कायम आहे.
भारताशी चर्चा सुरू करण्याबाबत भाष्यगेल्या वर्षी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत संबंध सुधारण्याबाबत भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, युद्ध हा पर्याय नाही. आम्ही भारताशी चर्चेसाठी तयार आहोत. भारत तयार असेल तर पाकिस्तान चर्चेसाठी तयार आहे. गेल्या 75 वर्षांत आम्ही 3 युद्धे लढली, यातून गरिबी, बेरोजगारी आणि संसाधनांचा अभाव वाढला. मात्र, काश्मीरचा मुद्दा बाजूला ठेवून दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकत नाही, असेही शेहबाज शरीफ म्हणाले होते.
नरेंद्र मोदींच्या शपथविधीला शेजारील देशांच्या प्रमुखांची हजेरीलोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जुगनाथ यांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती, मात्र चीन आणि पाकिस्तानच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते.