Viral Video : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनांमध्ये होणारी गर्दी ही भारतीयांसाठी नवी नाही. गेली कित्येक वर्षे भारतीय लोक या व्यवस्थेचा सामना करत आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र परदेशातही अशीच परिस्थिती असेल याचा कधी कोणत्या भारतीयाने विचारही नसेल केला. मात्र लंडनच्या रस्त्यावरील एका व्हिडीओमुळे याची खात्री पटली आहे.
लंडनच्या रस्त्यावरील गर्दीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तिथल्या एका बस स्थानकावर मोठा प्रमाणात गर्दी झालेली दिसत असून लोक बसमध्ये घुसण्यासाठी धडपडताना दिसत आहे. गर्दीतील काही महिला वृद्धांची काळजी घ्या, असे म्हणतानाही ऐकू येत आहेत. या व्हायरल व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लंडनमधील बस स्टॉपवर बसमधल्या प्रचंड जमावाच्या या व्हिडीओमध्ये एकजण नवनियुक्त महापौर सादिक खान यांचे नाव घेताना ऐकू येत आहे. लंडनच्या या वाईट परिस्थितीसाठी ती व्यक्ती त्यांना दोष देत आहे. पाकिस्तानी वंशाचे महापौर सादिक खान यांनी सलग तिसऱ्यांदा महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला.
हा व्हायरल व्हिडिओ १३ मे रोजी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला होता. व्हिडिओला काही दिवसांतच १.५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या वाढतच आहे. लंडनसारख्या शहरात लोकांचे असे हाल होत असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. एकमेकांना धक्काबुक्की करुन बसमध्ये चढत असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली. बसपासून थोड्याच अंतरावर लोकांची गर्दी पाहून दोन वृद्ध महिलांना काळजी वाटू लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे दोघांनीही गर्दीत जाणे टाळले.
या सगळ्या प्रकारावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सभ्य पद्धतीने लाईन लावणारी लोक कुठे गेली? हे लंडन आहे का? असा सवाल एका नेटकऱ्याने विचारला. आणखी एका युजरने हीच परिस्थिती आता सगळीकडे आहे,कोणीच शिस्तीचे पालन करत नाही, असं म्हटलं. आणखी एका युजरने, "दुर्दैवाने मी इथून फार दूर राहत नाही. काही लोकांना रांग म्हणजे काय हे माहित नाही? अनेक वेळा मला लोकांना मोठ्याने समजावून सांगावे लागले. या लोकांना कुणाचाही आदर नाही," असं म्हटलं आहे.