काबूल : ईशान्य अफगाणिस्तानात झालेल्या प्रचंड भूस्खलनात २ हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असून, माती व दगडाच्या लाटेखाली सापडलेले लोक ३0 फुटांपेक्षा जास्त खोलीवर दडपले गेले आहेत. बादकशान प्रांतातील अबी बराक हे गाव सामूहिक दफनभूमी म्हणून जाहीर करण्याचा विचार अधिकारी करीत आहेत. चिखलाच्या लाटेखाली दबलेले लोक जिवंत असण्याची शक्यता नाही, त्यामुळे मदत मोहीम थांबविली जाईल, असे बादकशान येथील संसदेचे सदस्य मोहंमद झायकेरिया सावदा यांनी घटनास्थळाला शनिवारी दिलेल्या भेटीत सांगितले. अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांनी रविवारी राष्ट्रीय शोक जाहीर केला असून, सर्व ध्वज अध्र्यावर उतरविण्यात आले आहेत. भूस्खलनाच्या दुर्घटनेतील नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करझाई यांनी केले असून, ही मानवी दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे. अबी बराक हे गाव पूर्णपणे चिखलाच्या लाटेखाली गाडले गेले आहे. गावातील कुटुंबेच्या कुटुंबे दरडीखाली गाडली गेली असून, या ढिगार्याखालून कोणाला बाहेर काढणे कठीण झाले आहे. अर्धाअधिक डोंगरच अबी बराक गावावर कोसळला, त्यामुळे त्याखाली गाडल्या गेलेल्यांचे मृतदेह बाहेर काढणेही कठीण आहे. डोंगर कोसळल्यामुळे नवीनच लग्न झालेल्या एका दाम्पत्याचे घर गाडले गेले, त्यांच्या मदतीसाठी शेजारी धावत असता दुसरी दरड कोसळली व सगळेचजण गाडले गेले. एका घरात लग्नाचा कार्यक्रम सुरू होता, ते घरही या आपत्तीत नाहीसे झाले. (वृत्तसंस्था)
अफगाणमधील भूस्खलनात २ हजारांवर लोकांचा बळी
By admin | Published: May 05, 2014 2:52 PM