वॉशिंग्टन - अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या नियमांकडे तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे आता येथील न्यायविभागाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. एका नव्या आदेशानुसार, आता कोरोना व्हायरसचा धोका दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्यांना येथे दहशतवादी समजण्यात येणार आहे.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार डेप्युटी अॅटर्नी जनरल जेफरी रोसेन यांनी म्हटले आहे, की जाणून बुजून हा व्हायरस पसरवणाऱ्यांवर आता दहशतवादी समजून कारवाई केली जाईल. संबंधित व्यक्तीने दुसऱ्याला जाणूनबूजून संक्रमित केले आहे, असे मानले जाईल. या नव्या नियमानुसार दोष सिद्ध झाल्यास अगदी जन्म ठेपेपर्यंतच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.
यासंदर्भात काढण्यात आलेल्या एक लिखित आदेशात म्हणण्यात आले आहे की, असे करणाऱ्यांना बायलॉजिकल एजंट समजले जाईल. अशा कोणत्याही व्यक्तीला देशात दहशतवाद पसरवत असल्यांतर्गत अटक करण्यात यावी. न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांना हा आदेश जारी करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, जे लोक या व्हायरसला शस्त्रबनवून इतरांना संकटात टाकत आहेत अशांना अमेरिकन जनता कदापी सहन करणार नाही.
अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या 69 हजारवर -
अमेरिकेत 69 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जर तब्बल 1 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत, 20 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत आणि यापैकी 80 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. यामुळे अमेरिकन सरकार अत्यंत चिंतेत आहे.
30 हजारांहून अधिक रुग्ण एकट्या न्युयॉर्कमध्ये -
अमेरिकेत दिवसेंदिवस शेकडोंच्या संख्येने कोरोना संक्रमित रुग्ण समोर येत आहेत. न्यूयॉर्कची परिस्थिती तर अत्यंत बिकट आहे. तेथे 30 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत रोजच्या रोज रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट होत चालली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत येत्या काही दिवसांत कोरोनामुळे शेकडोंच्या संख्येने मृत्यू होऊ शकतात. अशातच तेथे कोरोना व्हायरसने मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह वेगळे ठेवण्याचीही तयारी सुरू झाली आहे.
अनेक रुग्णालयांत कर्मचारी शवागार तयार करण्याच्या कामात -
सीएनएनच्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कच्या अनेक रुग्णालयांत कर्मचारी टेंट आणि रेफ्रिजरेटेडे ट्रकमध्ये शवागार तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. अमेरिकेतली परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचेही तेथील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. न्यूयॉर्कमध्ये आधीच आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ट्रकांमध्ये अशा प्रकारचे तात्पुरते शवागार 9/11च्या हल्ल्यानंतरही तयार करण्यात आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, अशा मृतदेहांना वेगळे ठेवण्यात येते, जेणेकरून हा संसर्ग आणखी पसरू नये.