वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या कडेकोट सुरक्षेतील व्हाईट हाऊसच्या कुंपणाच्या भिंतीवर चढून आत उडी टाकणा-या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वॉशिंग्टनचे उपनगर मेरिलँड येथील डोमिनिक अदेसान्या (२३) असे या व्यक्तीचे नाव आहे. अटक झाली तेव्हा अदेसान्या याच्याकडे शस्त्रे नव्हती. व्हाईट हाऊसचे कुंपण ओलांडल्याची महिन्याच्या आत घडलेली ही दुसरी घटनाआहे. सप्टेंबर महिन्यात कुंपणाची भिंत ओलांडून एक व्यक्ती व्हाईट हाऊसच्या परिसरात शिरली. तेथील सशस्त्र रक्षकांना ओलांडून आतही गेली. यानंतर व्हाईट हाऊसच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या आरोपावरून सुरक्षा प्रमुख ज्युलिया पिअर्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. बुधवारी झालेल्या तशाच प्रकारच्या घटनेत सायंकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी डोमिनिक कुंपणाच्या भिंतीवर चढला, सिक्रेट सर्व्हिसच्या लोकांनी लगेचच त्याला अटक केली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.या घटनेची चित्रफीत असून, त्यात पकडलेला माणूस शर्ट वर करून आपल्याकडे शस्त्रे नसल्याचे रक्षकांना दाखवत असताना दिसत आहे. (वृत्तसंस्था)
व्हाईट हाऊसच्या भिंतीवर चढणाऱ्या व्यक्तीला अटक
By admin | Published: October 24, 2014 3:30 AM