Peru Plane Crash: अनेकदा अपघातानंतर लोक अपघातग्रस्त परिसरात फोटो किंवा सेल्फी काढतात. सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा अशाप्रकारचे फोटो पाहिले असतील. पेरू देशातून अशाच प्रकारचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. राजधानी लिमा येथील विमानतळावर अग्निशमन ट्रकला धडकून विमानाला शुक्रवारी आग लागली होती.
सुदैवाने या भीषण अपघातातून विमानातील क्रू मेंबर्ससह सर्व 120 प्रवासी थोडक्यात बचावले. मात्र, या अपघातात दोन अग्निशमन दलाच्या जवानांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या अपघातानंतर एक जोडपे विमानातून बाहेर आले आणि त्यांनी त्या अपघातग्रस्त विमानासोबत सेल्फी काढली. हे जोडपे त्या अपघातातून थोडक्यात बचावले होते. एनरिक व्हर्सी-रोस्पिग्लिओसी असे त्या व्यक्तीचे नाव असून, फोटोमध्ये तो आपल्या पत्नीसोबत हसताना दिसत आहे.
या फोटोमध्ये जोडप्याच्या मागे LATAM एअरलाइन्सचे विमानही दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देते'. A320 Systems नावाच्या फेसबुक पेजनेही हा फोटो शेअर केला आहे. त्यात 'सेल्फी ऑफ द इयर, थँक गॉड तो ठीक आहे' असे कॅप्शन दिले होते. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला असून, काही लोक विमान अपघातात त्यांचा जीव बचावल्याचा आनंद साजरा करत आहेत.