लिमा : पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष अॅलन गार्सिया (६९) यांनी स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. एका लाचखोरीच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.प्रभावशाली वक्ते असलेले गार्सिया हे दोन वेळा पेरूचे राष्ट्राध्यक्ष झाले. आधी ते आक्रमक डावे म्हणून ओळखले जात होते. नंतर त्यांनी विदेशी गुंतवणूक आणि मुक्त व्यापाराचा पुरस्कार केला. अलीकडील काही वर्षांत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. ते त्यांनी फेटाळूनही लावले होते. तथापि, एका न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश दिल्याने त्यांनी जीवन यात्रा संपविली, असे सूत्रांनी सांगितले.ब्राझिलची बांधकाम कंपनी ‘ओडेब्रेश्ट’ने लॅटिन अमेरिकेत घडवून आणलेल्या सर्वांत मोठ्या लाच कांडात गार्सिया यांचे नाव आले आहे. कंत्राटे मिळविण्यासाठी कंपनीने राजकीय नेत्यांना लाच दिल्याचा आरोप आहे.या प्रकरणात बुधवारी पेरूच्या एका न्यायालयाने नऊ जणांच्या अटकेचे आदेश दिले होते. त्यात गार्सिया यांचाही समावेश आहे. सूत्रांनी सांगितले की, ओडेब्रश्ट लाच कांडात अटक होऊ नये, यासाठी गार्सिया यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)राष्ट्रवादी विचारांचा नेतागार्सिया यांच्या पक्षाने त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या कॅसिमिरो उल्लोआ हॉस्पिटलबाहेर त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली. यावेळी रुग्णालयाबाहेर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णालयात त्यांची हृदयक्रिया तीन वेळा बंद पडली होती. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.तथापि, ते वाचू शकले नाहीत, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. पेरूचे राष्ट्राध्यक्ष मार्टिन विझकारा यांनी गार्सिया यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.गार्सिया यांनी १९८५ ते १९९0 या काळात राष्ट्रवादी विचारांचा नेता म्हणून सत्ता सांभाळली होती. २00६ साली त्यांनी उदारमतवादी धोरणांचा पुरस्कार करून पुन्हा पाच वर्षांसाठी सत्ता मिळविली.
पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष गार्सिया यांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 4:09 AM