पेशावर : पेशावर येथील सैनिकी शाळेवरील अतिरेकी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला. या शाळेवर २०१४ मध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने हल्ला केला होता. या हल्ल्यात १४० विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते. अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील बांदर भागात अमेरिकेने शनिवारी ड्रोन हल्ला केला होता. त्यात दहशतवादी कमांडर कारी सैफुल्ला याच्यासह उमर मन्सूर उर्फ उमर नारे हा दहशतवादीही मारला गेला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उमर नारेच्या तीन सहकाऱ्यांचाही खात्मा झाला. सैफुल्ला आत्मघाती हल्लेखोरांचा प्रमुख होता. नारे आणि सैफुल्ला हे दोघेही तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या गीदर गटाचे सदस्य होते. जून २०१४ मध्ये पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू केल्यानंतर, हे दोघे अफगाणिस्तानात पळून गेले होते. नारेने २०१४ मध्ये पेशावर येथील शाळेवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर, जानेवारीत बाचा खान विद्यापीठावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधारही तोच होता. या हल्ल्यात २१ लोक ठार झाले होते. (वृत्तसंस्था)
पेशावर हल्ल्याचा सूत्रधार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2016 2:52 AM