भारताशेजारील देश पाकिस्तानातपेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तब्बल ४० रुपये कपात करण्यात आल्याने जनतेत आनंद पसरला आहे. पाकिस्तानातील आर्थिक परिस्थितीशी जगभरात चर्चा होत असताना महागाईने तेथील जनता त्रस्त झाली आहे. अशावेळी अनवर उल हक काकरच्या काळजीवाहू सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तानात पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आतापर्यंत सर्वात मोठी कपात झाल्याची चर्चा सोशल मीडियावरही ट्रेंडमध्ये आहे.
आता किती झाले दर?
पाकिस्तानात सरकार ३५ रुपयांपर्यंत इंधन दरात कपात करू शकते असं म्हटलं जात होते. परंतु जनतेला मोठं गिफ्ट मिळाले आहे. पेट्रोलच्या किंमती ४० रुपये प्रतिलीटर कमी केल्यात तर हायस्पीड डिझेलचे दर १५ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. आजपासून म्हणजे १६ ऑक्टोबरपासून नवीन दर लागू होतील. आता पाकिस्तानात लोकांना पेट्रोल २८३.३८ रुपये प्रतिलीटर आणि हायस्पीड डिझेल ३०३.१८ रुपये दराने मिळणार आहे. मागील ३० सप्टेंबर रोजी सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी ८ आणि ११ रुपये कपात केली होती.
भारतातही पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे जनतेच्या मनात रोष आहे. इंधन दरवाढीमुळे सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. देशात पेट्रोल जवळपास ९७ ते १०० रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ९० रुपये प्रतिलीटर विक्री होत आहे. शहरांनुसार हे दर बदलले आहेत. पुढील वर्षी भारतात लोकसभा निवडणुका आहेत अशावेळी पेट्रोल डिझेलचे दर कमी होऊ शकतात असे बोलले जाते. सध्या पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात महागाई आहे. अनेक गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत. त्यात पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घट केल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु आगामी काळात काय होईल हे सांगणे सध्या कठीण आहे.