लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: साैदी अरबने अचानक तेल उत्पादनात मे महिन्यापासून दरराेज ५ लाख बॅरल्स एवढी घट करण्याचा निर्णय जाहीर केला. साैदीसह ओपेक देश मिळून दरराेज सुमारे ७ ते ८ लाख बॅरल्स उत्पादन घटविणार आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर एका दिवसातच ८ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पेट्राेल आणि डिझेल दरवाढीचा झटका बसू शकताे.
कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे पेट्राेल आणि डिझेलचे दर घटण्याची शक्यता वाढली हाेती. मात्र, साैदी अरबच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. साैदीने वर्ष २०२२ मध्ये दरराेज सरासरी १.१५ काेटी बॅरल्स एवढ्या कच्च्या तेलाचे उत्पादन केले हाेते. त्यातुलनेत ही कपात ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे साैदीने म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकेतील मध्यावधीच्या ताेंडावर २० लाख बॅरल्स एवढी दैनंदिन कपात करण्यात आली हाेती.
एका दिवसात तेल भडकले- साैदीसह ओपेक देशदेखील उत्पादन घटविणार आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले. डब्ल्यूटीआय क्रूड तेल ८ टक्के तर ब्रेंट क्रूड तेल ५ टक्क्यांनी वाढून ८५ डाॅलर्स प्रति बॅरलवर पाेहाेचले. शुक्रवारी ब्रेंट क्रूड ८० डाॅलर्सच्या खाली बंद झाले हाेते.
भारतावर काय परिणाम हाेणार?
- देशात मे २०२२ पासून पेट्राेल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
- कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे तेल कंपन्यांना पेट्राेलवर ६ ते ८ रूपये प्रतिलीटर नफा हाेत आहे.
- डिझेल विक्रीतून ४ रूपये प्रतिलीटर ताेटा हाेत आहे. कच्चे तेल पुन्हा भडकल्यास पेट्राेल आणि डिझेलची दरवाढ केली जाऊ शकते.
मेपासून किमती स्थिर- युक्रेन युद्धानंतर इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर गेले हाेते. त्यानंतर पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपयांची कपात करण्यात आली हाेती. त्यानंतर बहुतांश राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली हाेती.
इंधन विक्री वाढली- मार्च महिन्यात पेट्राेल आणि डिझेलच्या विक्रीत माेठी वाढ झाली आहे. पेट्राेलची ५.१ टक्क्यांनी वाढून २६.५ लाख टन तर, डिझेलची मागणी २.१ टक्क्यांनी वाढून ६८.१ लाख टन एवढी झाली. मागणी वाढल्यानंतरच निर्यात बंदीला मुदतवाढ दिली.
- ५ लाख बॅरल्स दरराेज कपात साैदी अरब करणार.- २.११ लाख बॅरल्सची कपात इराक करणार आहे.- पेट्राेल आणि डिझेलचा तुटवडा हाेऊ नये, यासाठी सरकारने इंधनांच्या निर्यातीवरील निर्बंधांला मुदतवाढ दिली आहे. यापैकी ५० टक्के पेट्राेल तर ३० टक्के डिझेल देशात उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
मार्च महिन्यात असे वाढले कच्च्या तेलाचे दर
- ३० मार्च – ६,१९५
- २७ मार्च – ६,००३
- २३ मार्च – ५,८५७
- २१ मार्च – ५,७०८
- २० मार्च – ५,४०५
(भारतासाठीचे दर, आकडे रुपयांत)